Talegaon Dabhade News : नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसह 180 कोटींच्या विकास कामांचे होणार भूमिपूजन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामाचे भूमिपूजन उद्या शुक्रवारी (दि.3) सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. या इमारतीसाठी 64 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे तसेच अजित पवार यांच्या हस्ते मावळ तालुक्यातील तब्बल 180 कोटी 57 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन होणार आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे.

तसेच तळेगाव दाभाडे येथील कडोलकर काॅलनी येथील नगरपरिषदेने उभारलेल्या बेटी बचाओ, बेटी पढाओ या शिल्पाचे अनारण उद्या शुक्रवार (दि 3) सकाळी 11 वाजता उद्योग, खनिकर्म आणि पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Maval Water Issue : आंबी, गोळेवाडी, वारंगवाडी येथील पाणीप्रश्न सुटणार; नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात

यावेळी तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष गणेश खांडगे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विठ्ठल शिंदे, तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत दाभाडे, प्रवक्ते राजेश खांडभोर, शिक्षण मंडळाचे माजी सभापती व राष्ट्रवादीचे सुहास गरुड, संघटक संजय बाविस्कर, राजाभाऊ दौंडकर आणि पदाधिकारी पत्रकार परिषदेस उपस्थित होते.

शेळके म्हणाले, “मावळातील एकूण 180 कोटी 57 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते होणार आहे.मावळातील 81 कोटींच्या रस्ते विकास कामांसह तळेगाव नगरपरिषद हद्दीतील 26 कोटींच्या रस्त्याच्या कामांचा यात समावेश आहे. नगरपरिषदेने उभारलेल्या बेटी बचाओ, बेटी पढाओ शिल्पाच्या अनावरणासह तळेगाव दाभाडे मंडल कार्यालयाचे भूमिपूजनदेखील पवार यांच्या हस्ते होईल.”

यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री नगरविकास प्राजक्त तनपुरे, राज्यमंत्री उद्योग खनिकर्म आदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, माजीमंत्री मदन बाफना, माजी आमदार कृष्णराव भेगडे,दिगंबर भेगडे, माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे, माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, शासकीय अधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा

भूमिपूजनाच्या शासकीय कार्यक्रमानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे. तत्पूर्वी, दुपारी साडेचारला देहूरोड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते होईल. त्यानंतर सोमाटणे फाटा येथून भव्य दुचाकी रॅलीसह पवार यांचे मारुती मंदिर चौकात आगमन होईल. आंदर मावळ,नाणे मावळातील आदिवासी समाज बांधवांतर्फे पवार यांचा विशेष सन्मान करण्यातयेणार आहे.

राष्ट्रवादीच्या मेळाव्यास साधारणतः 10 ते 12 हजार लोक उपस्थित राहणार असल्याचा अंदाज लक्षात घेऊन नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिली. आमदार सुनील शेळके यांनी सर्व नागरीकांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.