Nagnath Kottapalle: पिंपरी-चिंचवड शहराचे भूषण थोर साहित्यिक ‘डॉ. नागनाथ कोत्तापल्ले’

एमपीसी न्यूज (श्रीकांत चौगुले) – पिंपरी-चिंचवड शहराचे भूषण थोर साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा विशेष लेख.

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले सर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक होते. ते पुणे विद्यापीठात आले. ते मराठी विभागाचे प्रमुख झाले, याच काळात आम्ही छोटे मोठे साहित्यिक उपक्रम करत होतो. आमची प्रेरणा साहित्य कला प्रतिष्ठान नावाची संस्था होती. त्यामध्ये एका कार्यक्रमाला सरांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले. त्यावेळी सरांना पहिल्यांदा पाहिले आणि ऐकले. त्यानंतर काही वर्षांनी 2003 मध्ये औंधला माधव राजगुरू यांच्या पुढाकारातून अक्षरभारती या संस्थेची आम्ही स्थापना केली. या संस्थेने अनेक साहित्य विषयक उपक्रम आयोजित केले. अक्षरभारतीतर्फे एक दिवसीय साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते .त्या संमेलनाचे कोत्तापल्ले सर अध्यक्ष होते, यातूनच त्यांचा अधिक परिचय झाला. 2005 मध्ये सर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू झाले. त्यानंतर त्यांच्या गाठीभेटी थोड्या कमी झाल्या. ते औरंगाबादहून परत आल्यावर सार्वजनिक कार्यक्रमांना अधिक वेळ देऊ लागले. अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालनाच्या निमित्ताने, कार्यक्रमाच्या निमित्ताने मी व्यासपीठावर असे. तेव्हा संवाद होत असे.

साधारण 2011 ला ते बालभारती पाठ्यपुस्तक संपादन मंडळाचे अध्यक्ष झाले. या समितीत मीही होतो. त्यामुळे त्यांचा अधिक सहवास मिळाला. ते पिंपळे सौदागरला राहायला असल्याने बहुतेक वेळा त्यांच्या सोबतच बैठकीला जाणे येणे घडत असे. तसा त्यांचा विद्यापीठ स्तरावरचा अनुभव पण लहान मुलांची पुस्तके करतानाही तितकीच आत्मीयता आणि चिकित्सक वृत्ती दिसून येत असे. 2014 पर्यंत सरांनी पाठ्यपुस्तकांचे काम केले. याच काळात त्यांचा सहवास आणि त्यांचे विचार ऐकण्याची संधी अधिक मिळाली. या दरम्यानच्या काळातच त्यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली ,त्यामुळे तत्कालीन काळातील घडामोडींचे साक्षीदार होता आले. विशेष म्हणजे संमेलनाचे अध्यक्षपदी निवड झाल्याचे साहित्य परिषदेत घोषित केले गेले, लगेचच मी आणि माधव राजगुरू सर आम्ही त्यांच्या घरी गेलो.

संमेलनाध्यक्ष निवडीबद्दल पहिला पुष्पगुच्छ देण्याचे, अभिनंदन करण्याचे भाग्य आम्हाला लाभले. त्यानंतर पत्रकार मंडळी आली. टीव्हीला बातम्या झळकायला लागल्या. ते पिंपरी चिंचवड शहरात, पिंपळे सौदागरला राहतात हे लोकांना कळाले .या भागातील साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी त्यांना निमंत्रित केले जाऊ लागले. अनेक कार्यक्रमात त्यांना नेण्या आणण्याची जबाबदारी माझ्यावर असायची. सरांचा तेवढाच सहवास मिळेल म्हणून मी ती आनंदाने स्वीकारायचो. या काळात त्यांच्याशी अनेक विषयांवर गप्पा व्हायच्या. सरांचे मूळगाव नांदेड जिल्ह्यातील मुखेड. गावी थोडीफार शेती. वडील प्राथमिक शिक्षक. घरात उत्तम संस्कार यामुळे बहुतेक भावंडे शिकली. सरांना मुळात साहित्याची आवड. महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळातच काही वर्षे त्यांनी मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यालयात काम केले होते. साहित्य परिषदेतला कारकून ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अशी सरांची प्रेरक वाटचाल आहे .

सरांचा स्वभाव तसा नम्र. ते कधीही पदाचा आव आणून वावरले नाहीत, पण पदाचे अवमूल्यन होईल असे वर्तनही त्यांनी केले नाही. त्याबद्दल त्यांनी एक किस्सा सांगितला होता.’ ते कुलगुरू असताना औरंगाबादला उच्च शिक्षण मंत्री दौऱ्यावर होते. त्यांनी कोत्तापल्ले सरांना भेटायला बोलावले, पण ते गेले नाहीत. शेवटी मंत्री कुलगुरूंना भेटायला आले. त्यावेळी त्यांनी आपल आसन सोडून बाहेर जाऊन त्यांचे स्वागत केले नाही, एरवी कुणाचाही अव्हेर न करणारे, नम्रपणे सामोरे जाणारे, कोत्तापल्ले सर पण ते म्हणाले.” कुलगुरूपद हे ज्ञानपीठाचे पद त्याचे काही संकेत आणि परंपरा आहेत. ती पाळलीच पाहिजे,” त्यांच्या वागण्या बोलण्यात कमालीचा साधेपणा होता. त्याबद्दल मी एकदा त्यांना विचारले तर ते सहजपणे म्हणाले “पदे येतात जातात, तो त्या काळापुरता भाग असतो. तुमचे वर्तन असे हवे की कधीही, कुठेही अगदी चहाच्या टपरीवर जाऊन चहा पिता आला पाहिजे. तरच तुम्ही आनंदाने जगू शकता”.
सर एकदम शांत संयमी. अगदीच पटणारा विनोद झाला तर हास्य फुलणार नाही तर बहुतांशी मंद स्मित करत दात देणार. एकदा आम्ही रिक्षाने जात होतो. सरांचा रिक्षात मोबाईल विसरला .काही वेळाने ते लक्षात आले. मी त्यामुळे अस्वस्थ झालो पण सरांचे स्मितहास्यच .शेवटी मी सरांच्या मोबाईलवर कॉल केला. रिक्षावाला परत मागे आला. त्याने मोबाईल परत दिला. त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल सरांनी त्याला बक्षीस दिले.

अनेक कार्यक्रमांना ते येत. महत्त्वाचे काम असेल किंवा बाहेरगावी असतील असे अपवाद वगळता, कार्यक्रम ते सहजतेने स्वीकारत. कुठलीही अट नाही. आढेवेढे नाहीत. त्यांना कशाची अपेक्षाही नसे. एकदा एका पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घाटनाला आम्ही गेलो होतो .सर आले म्हणून संयोजक एकदम खुश. त्याने सरांना सांगितले.’ तुमच्या आवडीची पुस्तके काढा. तुम्हाला मला ती भेट द्यायची आहेत.’ सरांनी एक कमी किमतीचे छोटेसे पुस्तक काढले आणि तेवढेच घेतले. सरांना राजकारणाविषयी फारशी आस्था नव्हती. एकदा एका नेत्याने मोठा मेळावा आयोजित केला होता. हजारो माणसे येणार होती. त्यामध्ये सरांचा सत्कार करायचा त्यांचा मानस होता.

“असल्या व्यासपीठावर आमच्यासारख्यांची आवश्यकता नाही “.असे म्हणत त्यांनी त्यांना नम्रपणे नकार दिला. या उलट एका छोट्या सोसायटीत उन्हाळ्याच्या सुट्टीतला संस्कार वर्ग होता. वाचन संस्काराच्या निमित्ताने त्यांना बोलावले होते. फारशी काही व्यवस्था नव्हती .घामावून व्हावे अशी स्थिती होती. सरांनी कशाबद्दल नाराजी व्यक्त केली नाही. उलट लहान मुलांशी त्यांनी संवाद साधला .पुस्तकांचे, वाचनाचे महत्त्व समजावून सांगितले. विधायक कार्याला सरांचा नेहमी पाठिंबा असे. लक्ष्मीकांत देशमुख संमेलनाचे अध्यक्ष झाल्यावर त्यांनी अभिजात मराठीसाठी साहित्यिकांनी आंदोलन केले पाहिजे, अशी भूमिका घेऊन त्याचे आयोजन केले .साहित्य परिषदेचे पदाधिकारी, निवडक साहित्यिकांनी मुंबईला आझाद मैदानावर आंदोलन करायचे, असे ठरले. पुण्यातून एक बस केली. कोत्तापल्ले सरही लगेच तयार झाले .त्यांच्यासोबत मलाही सहभागी होता आले. दिवसभराची दगदग, अव्यवस्था असतानाही आंदोलनाचा उदात्त्य हेतू लक्षात घेऊन, ते दिवसभर आनंदाने वावरले.

सर अकारण कुणाची स्तुती करणाऱ्यातले नव्हते. चांगल्या कामाला ते नेहमी प्रेरणा देत. त्यांनी अनेक पुस्तकांना प्रस्तावना दिल्या. ते पुस्तक पूर्ण वाचून काढत, टिपणे काढत ,मगच त्यावर सविस्तर लिहीत. त्यांनी राजकारणी किंवा मोठ्या माणसाशी मुद्दाम जवळीक केली नाही. स्वार्थ ठेवला नाही. तरीसुद्धा शासनाच्या अनेक समित्यांवर त्यांना काम करण्याची संधी मिळाली. सर साहित्यिक म्हणून थोर आहेतच. त्यांचे ललित, वैचारिक, समीक्षात्मक असे विविधांगी लेखन आहे. त्यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान मोठे आहेच पण ते माणूस म्हणूनही श्रेष्ठ होते.

सरांचे टपोरे वळणदार अक्षर होते. दिवाळी अंकासाठी लेख मागितला की त्यांच्या शैलीत लेखन करून, लेखाखाली सही करून ते देत असत. त्यांचं बोलणंही फार प्रवाही होतं असं नाही. आपल्या अभ्यासातून, चिंतनातून आलेले एक एक विचार ते मांडत असत. त्यांचे भाषण म्हणजे मुद्देसुत मांडणीचा पटच असे.

सर साधं सरळ मध्यमर्गीय आयुष्य जगले .फार अपेक्षा नाहीत. नेहमी समाधानी शांत स्थिरवृत्ती. त्यांनी अगदीच चैन केली ती म्हणजे वेळ मिळाला, तलप झाली की सिगरेटचा झुरका मारण्याची. कदाचित त्यांची ती सवयच बाधा ठरली असावी, असे वाटते. दिवाळीनंतर सरांशी बोलणे झाले होते. गोविंद गार्डनमध्ये भोजन आणि गप्पा असा बेतही ठरला होता. बाळासाहेब जवळकर आणि मी सरांना भेटणार होतो, पण ती इच्छा अपूर्णच राहिली. सरांच्या अनेक स्मृती मनात आहेत.
सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.

श्रीकांत चौगुले.
श्रीकृपा, काटेपुरम चौक. पिंपळे गुरव. पुणे 61.
7507779393

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.