Maval News : मावळात भाजपला मोठा धक्का, जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने जाहीर केली बाळासाहेब नेवाळे यांची उमेदवारी

एमपीसी न्यूज- भाजप मावळ चे जेष्ठ नेते बाळासाहेब नेवाळे यांना राष्ट्रवादीकडून जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्याने मावळच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे. अचानकपणे जाहीर झालेल्या ह्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादीसह भाजपच्या कार्यकर्त्यांचाही संभ्रभ उडाला आहे.

दरम्यान, मावळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत या बाबत कोणतीही कल्पना नसल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे व हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वरिष्ठ पातळीवरून घेण्यात आला आहे असे पक्षाचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांनी सांगितले.

बाळासाहेब नेवाळे हे पूर्वी राष्ट्रवादी पक्षातर्फे जिल्हा बँक व दूध संघावर संचालक म्हणून कार्यरत होते परंतु 2019 विधानसभेच्या निवडणुकींपूर्वी पक्षांतर्गत वरिष्ठांवर नाराजीमुळे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांसह भाजप मध्ये प्रवेश केला होता, मात्र आता जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केल्याने मावळ भाजपला मोठा धक्का बसला आहे.

बाळासाहेब नेवाळे हे ग्रामीण भागातील नेते असून त्यांचा स्वतंत्र चाहता गट आहे व त्यांनी दूध संघाच्या निवडणुकीसाठी बऱ्याच कालावधीपासून कंबर कसलेली पाहायला मिळाली होती. पण आता बाळासाहेब नेवाळे परत राष्ट्रवादीमध्ये जाणार की नाही याबाबत मावळ तालुक्यातील भाजप तसेच राष्ट्रवादीच्याही कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे.

यापूर्वी सुनील शेळके यांना भाजपने आमदारकीची उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली होती. त्याच पद्धतीने नेवाळे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.