Big Breaking News: भारत-चीन सैन्यांमधील चकमकीत 20 भारतीय जवान शहीद, प्रतिहल्ल्यात चीनचे 43 सैनिक टिपले

Big Breaking News: 20 Indian soldiers were martyred in Indo-Chinese clashes, 43 Chinese soldiers killed in counter-attack

एमपीसी न्यूज – पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात चीनबरोबर झालेल्या सशस्त्र चकमकीत किमान 20 भारतीय जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. या वृत्ताला भारतीय लष्कराकडून दुजोरा देण्यात आला आहे. दरम्यान, भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात चीनच्या 43 सैनिकांचा मृत्यू झाला अथवा  ते गंभीर जखमी झाले आहेत, अशी बातमी हाती आली आहे. चीनकडून त्याबाबत अद्यापि कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासमवेत रात्री उशिरा बैठक सुरू आहे.. चीनच्या सीमारेषेवरील चकमकीसंदर्भात ही उच्चस्तरीय बैठक चालू असल्याचे सांगण्यात येत आहे. चीनच्या कुरापतीला सडतोड उत्तर देण्यासाठी रणनीती निश्चित करण्यात येत असल्याचे समजते.

गेल्या काही दिवसांपासून भारत-चीन सीमेवर तणावाची परिस्थिती आहे. दोन्ही देशांकडून सीमेवर सैन्याची जमवा-जमव सुरू होती. सीमा वाद चर्चेने सोडविण्यासाठी राजनैतिक तसेच वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये बैठकाही झाल्या. त्यानंतर वातावरण निवळत असल्याचे संकेत मिळत होते. दोन्ही देशांनी आपापले सैन्य थोडे मागे घेतले होते.

ही परिस्थिती काल रात्री अचानक बिघडली. सुरूवातील तीन जवान शहीद झाले. त्यानंतर आणखी 17 जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे.

भारतीय सैन्याने सीमा ओलांडल्याचा आरोप चीनने केला आहे. तर भारताने तो आरोप फेटाळून लावत. चीनच्या सैन्याने भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भारतीय लष्कराने केला असल्याचे समजते. या संदर्भात अजून लष्कराकडून कोणतेही सविस्तर निवेदन करण्यात आलेले नाही.

दरम्यान, सीमारेषेवर पुन्हा शांतता निर्माण व्हावी, यासाठी दोन्ही देशांकडून वेगवान राजनैतिक हालचाली सुरू असल्याचे समजते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्वीट करून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये चिनी अतिक्रमणापासून आपल्या सीमेचे रक्षण करताना भारतीय लष्करी अधिकारी व जवानांना वीरगती मिळाली. आपलं सैन्यदल धैर्याने आणि दृढनिश्चयाने भारतीय सीमांचे रक्षण करत आहे. वीरमरण प्राप्त सैनिकांना मानवंदना व भावपूर्ण श्रद्धांजली, असे पवार यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.