गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

Bijalinagar News: भुयारी मार्गाच्या अनुषांगिक कामासाठी 4 कोटींचा खर्च; भुयारी मार्गाचा खर्च वाढता वाढे!

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत बिजलीनगरकडून गुरूद्वाराकडे जाणा-या रस्त्यावर उभारण्यात येत असलेल्या भुयारीमार्गाचे काम कासवगतीने सुरू आहे. कामाची गती संथ असली तरी खर्चाची गती मात्र वाढतच चालली आहे. आता भुयारी मार्गाच्या कामासाठी नव्याने 4 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. भुयारी मार्गाचे अनुषांगिक काम कृष्णाई इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदाराला दिले असून त्याकरिता 4 कोटींचा खर्च केला जाणार आहे. याबाबतच्या आयत्यावेळच्या प्रस्तावाला स्थायी समितीने बिनबोभाट मान्यता दिली. दरम्यान, भुयारी मार्गाच्या कामाला 2 मार्च 2021 पर्यंत दिलेली मुदतवाढ संपून 5 महिने पूर्ण झाले. तरी, काम पूर्ण झाले नाही. आता पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (पीसीएनटीडीए) ते बिजलीनगर, चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी आणि रेलविहार सोसायटी या परिसराकडे येण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत होण्यासाठी रेल्वे मार्गावर महापालिकेमार्फत स्पाईन रस्त्यावर पूल बांधण्यात आला होता. हा पूल ओलांडून वाल्हेकरवाडीकडे जाण्यासाठी तसेच डावीकडे, उजवीकडे बिजलीनगर आणि गुरूद्वाराकडे जाण्यासाठी रस्ता आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात रहदारी असल्याने वारंवार वाहतूक कोंडी आणि अपघात होण्याच्या प्रमाणात वाढ झाली होती. हा चौकाचा भाग दोन्ही बाजूंच्या रस्त्यांपेक्षा उंच आहे. त्यामुळे या ठिकाणी भुयारी मार्ग करण्यासाठी योग्य अशी भौगोलिक परिस्थिती होती. या ठिकाणचा हा अडथळा दूर करण्यासाठी महापालिकेमार्फत बिजलीनगरकडून गुरूद्वाराकडे जाणा-या रस्त्यावर भुयारीमार्ग करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते.

याठिकाणी व्हेईक्युलर भुयारी मार्ग बांधण्याच्या कामाचे अंदाजपत्रक करण्यास एनआयसीईपीएल यांना सांगण्यात आले. त्याप्रमाणे सुरूवातीला सर्व बाबी गृहित धरून 20 कोटीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. तथापि, मुळ प्रशासकीय मान्यता 15 कोटी असल्याने अंदाजपत्रक मान्य करताना 14 कोटी 25 हजार रूपये इतक्या रकमेला मान्यता देऊन निविदा मागविण्यात आल्या. लघुत्तम निविदाकार कृष्णाई इऩ्फ्रास्ट्रक्चर यांना 3 मार्च 2018 रोजीच्या निर्णयानुसार कामाचे आदेश देण्यात आले. त्यानंतर या रस्त्याचे सर्व्हेक्षण करण्यात आले. या सर्व्हेक्षणानुसार, झोपडपट्टी अतिक्रमण, वृक्ष, भुमिगत विद्युत वाहिनी, विद्युत जनित्र, बस थांबा, जल:निसारण नलिका, पाणीपुरवठा नलिका या बाबी रस्त्यात अडथळा ठरत असल्याचे निदर्शनास आले. हे अडथळे दूर करणे आवश्यक होते. या अडचणी लक्षात घेऊन या ठिकाणी वाहतूक सुरळीत राहण्यासाठी योग्य पद्धतीने निरीक्षण करून वाहतूक आराखडा तयार करण्यात आला.

भुयारी मार्गाच्या वाढीव 4  कोटी 66 लाख रूपये आणि एकूण खर्च 18 कोटी 66 लाख रूपये इतक्या सुधारीत खर्चास 30 डिसेंबर 2020 रोजीच्या स्थायी समिती सभेत मान्यता दिली होती. भुयारी मार्गाच्या कामास आयुक्तांनी 2 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ दिली होती. ती मुदत संपूण 5 महिने झाली. तरी, भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले नाही. आता  बिजलीनगर भुयारी मार्गाची अनुषंगिक कामे करण्यासाठी महापालिकेने 4 कोटी 11 लाख 29 हजार 212 रुपयांची निविदा प्रसिद्ध केली होती. त्यात कृष्णाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, एच. सी. कटारिया आणि व्ही. एम. मातेरे इन्फ्रास्ट्रक्चर या तीन ठेकेदारांनी सहभाग घेतला.

त्यापैकी कृष्णाई इन्फ्रास्ट्रक्चर  ठेकेदाराची निविदा रकमेच्या 4 कोटी 11 लाख मधून रॉयल्टी व मटेरीयल टेस्टींग चार्जेस वगळून 4 कोटी 10 लाख पेक्षा 4.21 टक्के कमी दराची आहे. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी 30 जुलै 21 रोजी ही निविदा स्वीकारण्यास मान्यता दिली. त्यानुसार कृष्णाई इन्फ्रास्ट्रक्चर यांच्याकडून 3 कोटी 96 लाख 30 हजार 245 रुपयांमध्ये काम करुन घेण्यात येणार आहे. त्यांच्यासोबत करारनामा करण्यास स्थायी समितीने बुधवारी आयत्यावेळी मान्यता दिली. या नवीन कामात बाकी असलेले आरसीसी काम, साईडचे रोड आणि आतमधून म्युरल्यस केले जाणार आहेत.

 

Latest news
Related news