Chinchwad News: अवेळी, अपुरा, अनियमित पाणीपुरवठ्याने बिजलीनगरवासीय त्रस्त

पालिकेचे दुर्लक्ष

एमपीसी न्यूज – चिंचवड, बिजलीनगर येथील गिरीराज हाऊसिंग कॉम्प्लेक्स आणि शाहू उद्यान परिसरातील नागरिक पाण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. अवेळी रात्री 9 ते पहाटे 3 वाजेपर्यंत पाण्याची वेळ केली आहे. तसेच अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा होत आहे.  सुमारे दोन हजार नागरिक या समस्येने हैराण आहेत. पाण्याची वेळ बदलताना अधिकाऱ्यांनी नागरिकांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करत पाण्याची वेळ बदलून सकाळी किंवा संध्याकाळी करण्याची मागणी गृहनिर्माण सोसायटीतील नागरिकांनी केली आहे.

याबाबत पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, गिरीराज हाऊसिंग कॉम्प्लेक्स आणि शाहू उद्यान परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक महिन्यापासून  अपुरा, अनियमित व रात्रीच्या वेळेत पाणीपुरवठा होत आहे. पाणीपुरवठ्याची वेळ रात्री 9 ते पहाटे 3 वाजेपर्यंत केली आहे. पाणी पाणीपुरवठ्यातील वेळेच्या नियोजनात  बदल करत असताना नागरीकांना विश्वासात घेणे आवश्यक होते.  परंतु नागरीकांना कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता, कोणत्याही प्रकारच्या सूचना,  नागरिकांच्या हरकती न मागवता हा बदल केला गेलेला आहे.

या भागात बैठी घरे अत्यंत कमी असून इमारतीचे प्रमाण  अधिक आहे.  महापालिकेतर्फे रात्री  होणारा पाणीपुरवठा हा सुरुवातीला अत्यंत कमी दाबाने होतो.   इमारतीमध्ये वरील मजल्यावर पाणी साधारण 2 ते 3 तास उशिराने पोहोचते.  त्यामुळे पाणी भरून ठेवण्यासाठी लोकांना रात्री उशिरापर्यंत जागावे लागत आहे. याचा विपरीत परिणाम देखील नागरिकांच्या दिनचर्येवर व आरोग्यावर होत आहे.
आमच्या प्रभागातील इतर भागात योग्य वेळेत पाणीपुरवठा होत असून फक्त आमच्याच भागात रात्री उशिराने पाणीपुरवठा होत आहे. आमचा भाग हा 100 टक्के अधिकृत नळजोडणी असलेला भाग आहे.   सर्व नागरिक नियमित व निर्धारित वेळेत पाणीपट्टी भरत आहेत. असे असताना  पाण्यासाठी येथील नागरिकांना झगडावे लागणे हे अत्यंत खेदजनक व कुठतरी नागरिकांमध्ये भेदभाव करण्यासारखं वाटत आहे.

गिरीराज हाऊसिंग कॉम्प्लेक्स आणि शाहू उद्यान परिसरात जेष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना नियमितपणे औषधे खाऊन रात्री वेळेत झोपावे लागते. कामगारांचे प्रमाणही जास्त आहे. कामावर जाण्यासाठी त्यांना सकाळी लवकर उठावे लागते. रात्री पाणी येत असल्याने त्यांना उशिरापर्यंत जागावे लागत आहे. त्यामुळे नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. नागरिकांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडू लागले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा वेळेत तत्काळ बदल करावा.  सकाळी किंवा संध्याकाळी पाणीपुरवठ्याची वेळ करण्याची मागणी गृहनिर्माण सोसायटीतील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.