Dehuroad : पूर्ववैमनस्यातून दुचाकी पेटवली; दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन जणांनी मिळून एक मोपेड दुचाकी पेटवून दिली. ही घटना मंगळवारी (दि. 21) दुपारी दोनच्या सुमारास चव्हाणनगर, वडाचामाळ, देहूगाव येथे घडली.

पोपट साहेबराव शिंदे (वय 28, रा. चव्हाणनगर, वडाचामाळ, देहूगाव) आणि त्याचा एक साथीदार (पुर्ण नाव पत्ता माहीती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अहमद आझमत शेख (वय 27, रा. चव्हाणनगर, वडाचामाळ, देहूगाव) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांची 19 एप्रिल रोजी किरकोळ कारणावरून भांडणे झाली होती. त्या भांडणात आरोपींनी फिर्यादी यांना हाताने मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी केली होती. त्याच भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी यांच्या घरासमोर लावलेली फिर्यादी यांची मोपेड दुचाकी (एम एच 14 / एच वाय 8269 मंगळवारी दुपारी पेटवून दिली.

याबाबत फिर्यादी यांनी त्यांच्या मित्राच्या मध्यस्थीने आरोपीला विचारणा केली. त्यावर आरोपीने भरपाई देतो असे सांगितले. मात्र आरोपीने नंतर भरपाई देण्यास टाळाटाळ केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.