Bill Gates and Melinda Gates Divorce : 27 वर्षांनंतर बिल गेट्स आणि मेलिंडा घेणार घटस्फोट

एमपीसी न्यूज – मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक असणाऱ्या बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी लग्नाच्या 27 वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांनीही एक संयुक्त पत्रक जारी करत यापुढे आम्ही दोघं एकत्र राहू शकत नाही, असं स्पष्ट केलं आहे. बिल गेट्स आणि मेलिंडा यांचं लग्न 1994 साली झालं होतं. बिल गेट्स हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत.

बिल यांनी ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली आहे. ‘बऱ्याच चर्चेनंतर आणि आपल्या नात्यावर बरंच काम केल्यानंतर आता आम्ही लग्नबंधनातून मुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. मागील 27 वर्षांमध्ये आम्ही आमच्या तीन मुलांना एकत्र वाढवलं. आम्ही एक फाउंडेशन तयार केलं जे जगभरातील लोकांना आरोग्य सुविधा आणि चांगलं राहणीमान देण्यासाठी प्रयत्न करत आहे,’ असं म्हटलंय.

बिल आणि मेलिंडा यांनी सिएटलमधील किंग काऊण्टी सुपिरियर कोर्टात दाखल केलेल्या संयुक्त याचिकेमध्ये ‘आम्ही कारण सांगू शकत नाही मात्र हे लग्न मोडावं लागत आहे,’ असं म्हटलं आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार ‘बिल अँड मेलिंडा गेट्स’ने हे दोघे घटस्फोट घेणार असले तरे फाउंडेशनमधील आपली जबाबदारी आणि पद कायम ठेवणार आहेत. फाउंडेशनमध्ये 65 वर्षीय बिल हे अध्यक्ष आहेत. घटस्फोटानंतरही बिल आणि मेलिंडा एकत्र काम करतील. मेलिंडा सध्या फाउंडेशनच्या उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहे.

बिल आणि मेलिंडा यांची पहिली भेट 1987 साली झाली होती. त्यावेळी मेलिंडा यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये प्रोडक्ट मॅनेजर म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. सन 1994 मध्ये या दोघांनी हवाई बेटांवरील लानी बेटावर त्यांनी लग्न केलं होतं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.