Chinchwad News: बायोमेडिकल कचरा टाकला जातोय रस्त्यावर, नागरिकांच्या जिवीतास धोका

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात काही खासगी रुग्णालयाकडून बायोमेडिकल कचरा थेट रस्त्यावर  कुंडीच्या बाहेर टाकला जात असल्याने वाल्हेकरवाडी (चिंचवड) येथील चिंतामणी प्रवेशद्वार स्पाईनरोड परिसरातील नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे.

सद्यस्थितीत महामारीच्या संकटात कोरोना संसर्गाचा मोठा धोका असतानाही खासगी दवाखाने, रुग्णालये बायोमेडिकल वेस्टेज राजरोसपणे थेट असे रस्त्याच्या कडेला टाकत असल्याचा धक्कादायक प्रकार आला आहे.

माजी नगरसेवक राजेंद्र साळुंखे यांनी ही बाब महापालिका आयुक्तांना तसेच आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यावर आयुक्तांनी आरोग्य अधिकारी डाॅ. अनिल राॅय यांना चौकशी करण्याच्या सूचना दिल्याचे साळुंखे यांनी सांगितले.

माजी नगरसेवक राजेंद्र साळुंखे म्हणाले, हा सर्व कचरा उघड्यावरच टाकत असल्याने रुग्णांसाठी वापरण्यात आलेले इंजेक्शन्स, सलाईनच्या नळ्या, बाटल्या, हातमोजे, औषधांच्या बाटल्या हे सर्व वेस्टेज नागरिकांच्या आरोग्यास बाधा पोहोचवण्यास कारणीभूत ठरत आहेत.

वास्तविक केंद्रीय पर्यावरण व जलवायू परिवर्तन मंत्रालयाने 28 मार्च 2016 रोजी जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन अधिनियम लागू केला आहे. त्या कायद्यानुसार जैव वैद्यकीय कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.

मात्र कोरोना काळात पिंपरी चिंचवडमध्ये त्याला खो बसत आहे. सध्या कोरोना काळात आगोदरच नागरिकांच्या मनामध्ये प्रचंड भीती आहे. अशातच अशा स्वरूपाच्या गंभीर चुका  खासगी रुग्णालय करत आहे.

या रुग्णालयाकडून घातक असा बायोमेडिकल वेस्ट कचऱ्याच्या संकलनासाठी स्वंतत्र वेस्टेज मॅनेजमेंटची नियुक्ती न करता राजरोसपणे कचरा रस्त्यावर फेकला जात आहे. कोविड काळात आणि इतरवेळीही रुग्णालयातील बायो वेस्टेज कचऱ्याचे रुग्णालयातूनच वर्गीकरण करणे बंधनकारक आहे.

त्यासाठी कोणता कचरा काळ्या, निळ्या, पिवळ्या, पांढऱ्या रंगाच्या पिशव्यांत टाकावा, असे सूचित केलेले आहे. यासाठी महापालिकेकडून स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र या रुग्णालयाकडून कोणत्याही प्रकारे बायोमेडिकल वेस्टचे विलगीकरण केले जात नसून ते रस्त्यावर फेकले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

महापालिकेने अशा रुग्णालयाचा शोध घेऊन कारवाई करणे हे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. आश्चर्याची बाब म्हणजेे काही खाजगी रुग्णालय कोरोना रुग्णाच्या बिला मध्ये बायोमेडिकल वेस्टचा अतिरिक्त चार्ज आकारत असल्याचे कोरोना रुग्णांचे म्हणणे असल्याचेही ते म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.