Bhosari : बायोमेडीकल वेस्ट उघड्यावर; रुग्णालयाकडून 25 हजार रुपयांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने बायोमेडीकल वेस्ट उघड्यावर टाकणा-याला दणका दिला आहे. भोसरीतील पुणे नाशिक रस्त्यालगतच्या मंकिकर मुलांचे हॉस्टिपल अॅन्ड लॅब (डॉ. काळे) हॉस्पिटलकडून आरोग्य विभागाने 25 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. याबाबतची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी दिली.

पुणे नाशिक रस्त्यालगतच कचरा कुंडीमध्ये कचरा उचलणा-या सेवकांना कचऱ्यात इंजेक्‍शनच्या सुया तसेच बायोमेडीकल वेस्ट आढळून आले.  या प्रकाराची माहिती वरिष्ठांना दिली. त्यानंतर आरोग्य निरीक्षकांनी या कचऱ्याची तपासणी केली. त्यात डॉ. काळे यांचे मंकिकर मुलांचे हॉस्पिटलच्या रिसिट तसेच औषधांच्या चिठ्ठ्या आढळून आल्या. त्यानंतर लगेच या कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटल प्रशासनास ही बाब कळवित या प्रकारापोटी धोकादायक कचरा उघड्यावर टाकल्याने रुग्णालय प्रशासनास 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

दरम्यान, हॉस्पिटल तसेच रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात बायोमेडीकल वेस्ट तयार होते. त्यात इंजेक्‍शन, सलाईन, ऑपरेशननंतरचे शरीराचे अवयव, रुग्णांसाठी वापरण्यात आलेले बँडेज तसेच रुग्णालयात तयार होणाऱ्या कचऱ्याचा समावेश आहे. कायद्याने या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्‍यक आहे. मात्र, रुग्णालयांकडे ही यंत्रणा नाही. परंतू, महापालिकेनेच शहरातील रुग्णालयांसाठी सशुल्क स्वरुपात ही यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे.

त्यासाठी शहरातील रुग्णालयांची नोंदणी करून त्यांना ही सुविधा दिली जाते. मात्र, त्यानंतरही काही रुग्णालयांकडून पैसे वाचविण्याच्या नादात हे वेस्ट कचरा पेटीत टाकला जातो. त्यामुळे शहरातील कचरा वेचकांना या सुया टोचने तसेच या कचऱ्यामुळे आरोग्याचे गंभीर परिणाम सहन करावे लागतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.