Bird Flu in Maharashtra : परभणीत ८०० कोबड्यांचा ‘बर्ड फ्लू’ने मृत्यू

एक किलोमीटर परिसरातील दहा हजार कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश

एमपीसी न्यूज : परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावातील 800 कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोंबड्या दगावल्याने स्थानिक प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेऊन या कोंबड्यांचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. त्यात या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूनेच झाल्याचं निदान करण्यात आलं आहे.

त्यामुळे एकच खळबळ उडाली असून जिल्हा प्रशासनाने मुरुंबा गावातील एक किलोमीटर परिसरातील दहा हजार कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. आज संध्याकाळपर्यंत या दहा हजार कोंबड्या मारून जेसीबीने खड्डा खोदून त्यातया कोंबड्या गाडण्यात येणार आहे.

मुरुंबा गाव बर्ड फ्ल्यू संसर्गित म्हणून घोषित

मुरुंबा गावात कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने मुरुंबा गाव बर्ड फ्ल्यू संसर्गित म्हणून घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे या गावात कोंबड्यांचं सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी पशुसंवर्धक विभागाचं पथक या गावात तळ ठोकून आहे.

कोंबड्यांच्या खरेदी विक्रीला बंदी

मुरुंबा गावात बर्ड फ्ल्यूचा फैलाव झाल्याने या गावाला प्रतिबंधक क्षेत्र म्हणूनही जाहीर करण्यात आलं असून या गावात कोंबड्यांची खरेदी-विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच कोंबड्यांची वाहतूक करण्यासही मनाई करण्यात आली आहे. तसेच या गावात अंडी खरेदी करण्यासही मनाई करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

कुपटामध्ये 500 कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू

मुरुंबा येथे 800 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचं उघड झालेलं असतानाच जिल्ह्यातीलच कुपटा या गावात 500 कोंबड्यांचा मृत्यूही बर्ड फ्ल्यूने झाल्याचं उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे कुपटा येथेही कोंबड्यांच्या खरेदी-विक्रीस मनाई करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.