Bird Flu : बर्ड फ्लूबाबत भीती नको, अशी घ्या काळजी…

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा संसर्ग देशात सुरु असताना बर्ड फ्लू या आजाराने डोकं वर काढलं आहे. देशातील दहा राज्यात याचा शिरकाव झाला असून, पशुसंवर्धन विभागाने सर्वांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. चिकन, अंडी खाणाऱ्या नागरिकांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. आरोग्य विभागाने नागरिकांना भीती न बाळगता काळजी घेण्याचं आवाहन केले आहे.

नागरिकांच्या मनात चिकन, अंडी खाण्याबाबत शंका निर्माण झाली आहे. बर्ड फ्लूचं संकट उभे राहिले असताना असा आहार सुरक्षित आहे का याबाबत आरोग्य विभागाने शंका निरसन केले आहे. नागरिकांनी याकाळात कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले आहे.

या गोष्टी करा –

– पक्षी, कोंबड्याचे पिंजरे आणि ज्या भांड्यात त्यांना रोज खाणे दिले जाते अशी भांडी रोज डिटर्जंट पावडरने स्वच्छ धुवावित

– शिल्लक उरलेल्या मांसाची योग्य विल्हेवाट लावा.

– एखादा पक्षी मरण पावला तर अशा पक्षाला उघड्या हाताने स्पर्श करु नका. जिल्हा तसेच विभागीय नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती द्या.

– कच्च्या पोल्ट्री उत्पादनासोबत काम करताना पाणी व साबणाने आपले हात वारंवार धुवा.

– व्यक्तिगत स्वच्छता राखा, परिसर स्वच्छ ठेवा.

– कच्चे चिकन किंवा चिकन उत्पादनासोबत काम करताना मास्क आणि ग्लोव्हसचा वापर करा.

– पूर्ण शिजवलेले मांसच खा.

– आपल्या परिसरात जलाशय किंवा तलाव असतील आणि या तलावात पक्षी येत असतील तर अशी ठिकाणे वन विभाग अथवा पशुसंवर्धन विभागास कळविणे आवश्यक आहे.

 या गोष्टी टाळाव्यात –

– कच्चे चिकन किंवा कच्ची अंडी खाऊ नका.

– पक्ष्यांचा रक्तस्त्राव तसेच विष्ठेसोबत संपर्क टाळा.

– अर्धवट शिजलेले मांस/चिकन किंवा अर्धवट उकडलेली अंडी खाऊ नका.

– आजारी दिसणाऱ्या सुस्त पडलेल्या पक्षाच्या संपर्कात येऊ नका. पूर्णपणे शिजलेले मांस आणि कच्चे मांस एकत्र ठेवू नका.

अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक 104 वर फोन करावा अथवा जवळच्या शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य विभागाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.