Vadgaon Maval News : पुण्यातील साळुंब्रे येथे बर्ड फ्लूमुळे कोंबड्यांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यातील साळुंब्रे येथील पोल्ट्री व्यावसायिकाच्या फार्म मधील कोंबड्या मृत पावल्याची माहिती तालुका पशुधन अधिकाऱ्यांना मिळाल्या नंतर सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. त्याचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आल्यानंतर, बर्ड फ्लू आजाराची खबरदारी म्हणून आज सभापती कृषी व पशुसंवर्धन बाबुराव आप्पा वायकर यांनी पोल्ट्री फार्मला प्रत्यक्ष भेट दिली.

पोल्ट्री फार्मवरील पंचनामा करून अंदाजे 3500 पक्षांची जेसीबीच्या साहाय्याने खड्डे घेऊन विल्हेवाट लावण्यात आली तसेच आजूबाजूच्या 1 किलोमीटर परिसरातील सुमारे 32,700 पक्षांची विल्हेवाट देखील लावण्यात येणार असल्याची माहिती तालुका पशुधन अधिकारी डॉ. अंकुश देशपांडे यांनी दिली.

यावेळी तहसीलदार मधुसूदन बर्गे, मावळ गट विकास अधिकारी सुधीर भागवत, आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे, तालुका पशुधन अधिकारी डॉ. अंकुश देशपांडे, डॉ. अनिल परंडवाल, डॉ. राक्षे, तलाठी दिलीप राठोड, माजी उपसरपंच विशाल वाहिले, पै. सुनील दंडेल, अॅड. अक्षय रौधळ इत्यादी अधिकारी, पदाधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी सभापती बाबूराव आप्पा वायकर यांनी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना पोल्ट्री फार्म वरील कोंबड्यांची त्वरित विल्हेवाट लावा तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांची प्राथमिक स्वरूपाची आरोग्य तपासणी करून घेण्याच्या व पंचनामा केलेल्या ठिकाणापासून 10 किलोमीटर परिसरामध्ये कोंबड्यांचे मांस विक्री तसेच वाहतुकीवर कडक निर्बंध लावण्याच्या सूचना देण्यात आल्या.

तसेच काल पालकमंत्र्यांनी घेतलेल्या DPDC च्या मिटिंग मध्ये उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री  अजित पवार यांच्या कडे पोल्ट्री व्यावसायिकांच्या झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई प्रतीकोंबडी दर अतिशय कमी मिळत असून त्यात वाढीव रक्कम मिळून यावी अशी विनंती देखील केल्याचे सभापती यांनी या वेळी पोल्ट्री व्यावसायिक व शेतकऱ्यांना सांगितले, तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांना घाबरून न जाता शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देऊ असे आश्वासन यावेळी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.