Bird Flu News : राज्यात दहा दिवसांत तब्बल 8 हजार 273 पक्षांच्या मृत्यूची नोंद

एमपीसी न्यूज – कोरोना संसर्गाचं देशात थैमान सुरू असताना बर्ड फ्लूमुळे व पक्षांच्या आकस्मिक मृत्यूच्या संख्येत वाढ झाली आहे. राज्यात 8 ते 18 जानेवारी दरम्यान तब्बल 8 हजार 273 पक्षांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या पत्रकात याबाबत माहिती देण्यात आली आहे.

पत्रकातील माहितीनुसार, महाराष्ट्र राज्यात 18 जानेवारीला 1,290 कुक्कुट पक्षांमध्ये मरतुक झाली आहे. बगळे, पोपट, चिमण्या अशा अन्य पक्षांमध्ये राज्यात 76 इतर पक्षांची आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. कावळ्यांमध्ये राज्यात 93 मरतुक आढळून आली आहे.

आजतागायत एकूण तब्बल 8 हजार 273 विविध पक्षांच्या मृत्यूची नोंद झाली असल्याचे पत्रकात म्हटले आहे. मरतुक झालेल्या पक्षांचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेत व पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत.

18 जानेवारी पुर्वी पाठवलेल्या नमुन्यांचे तपासणीचे निष्कर्ष राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था, भोपाळ येथून प्राप्त झाले आहेत. त्यापैकी कुक्कुट पक्षांमधील काही नमुने होकारार्थी आले आहेत. त्यात मावंदा व रायता (ता. कल्याण जि. ठाणे), मरीआईवाडी (ता. लोणंद, जि. सातारा), वरवटी (ता. अंबेजोगाई, जि. बीड), दावणगाव ( ता. रेणापूर, जि. लातूर), चिखली (ता. कंधार) व तलाहारी (ता. किनवट, जि. नांदेड), वारंगा (ता. हिंगणघाट, जि. नागपूर व गडचिरोली), अशा प्रकारे सात जिल्ह्यांतील कुक्कुट पक्षांचे नमुने बर्ड फ्लूसाठी होकारार्थी आले आहेत.

कुक्कुट पक्षांमधील नमुनेही होकारार्थी आल्यानुसार, सदर क्षेत्रास “नियंत्रित क्षेत्र” म्हणून घोषीत करण्यात येत असून, तेथे प्राण्यांमधील संसर्गजन्य व संक्रामक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 2009 अन्वये निर्धारित प्रतिबंधक निर्देश लागू करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

सात जिल्ह्यातील 14 ठिकाणी बर्ड फ्लूसाठी कुक्कुट पक्षी नमुने होकारार्थी आढळून आलेल्या पोल्ट्री फार्मपासून 9 किमी त्रिज्येच्या अंतरामध्ये येणाऱ्या सर्व 25 हजार 229 कुक्कुट पक्ष्यांना शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे.

तसेच वरील सर्व ठिकाणी निर्जतुकीकरणाची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. तसेच 9 ते 10 किमी सर्वेक्षण क्षेत्रात सर्वेक्षणाचे काम करण्यात येत आहे.

राज्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत होणा-या पक्षांमध्ये मर्तूक झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यावसायीक पोल्ट्री फार्ममधील पक्षांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मर्तूक झाल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ नजिकच्या पशुवैदयकिय दवाखान्यामध्ये याची माहिती दयावी.

तसेच, पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या 18002330418 या टोलफ्री दुरध्वनी क्रमांकावर माहिती दयावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.