Happy Birthday Sunidhi: ‘शीला की जवानी’ म्हणत ‘क्रेझी’ करणा-या सुनिधी चौहानचा आज वाढदिवस

birthday of singer sunidhi chauhan वयाच्या सोळाव्या वर्षीच तिने रामगोपाल वर्माच्या 'मस्त' या चित्रपटाची गाणी मस्तीत गायली. त्यानंतर एकापाठोपाठ एक अशी सरस गाणी सुनिधीने दिली.

एमपीसी न्यूज – एका वेगळ्याच धाटणीच्या आवाजाची मालकीण असलेल्या युवा पार्श्वगायिका सुनिधी चौहान हिचा आज वाढदिवस. तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वयाच्या अकराव्या वर्षांपासूनच गाणे सुरु करणा-या सुनिधीचा जन्म 14 ऑगस्ट 1983 रोजी दिल्ली येथे झाला. तिने आपल्या करियरची सुरुवात वयाच्या अवघ्या चार वर्षांची असतानाच केली होती. तिचे वडीलदेखील थिएटर आर्टिस्ट होते. एका मुलाखतीत सुनिधी म्हणाली होती की, ‘मी सगळ्यात पहिल्यांदा एका देवीच्या जागरणात गायले होते. लोकांना माझे ते गाणे आवडले. मग मी स्टेजवर गाऊ लागले’.

एका रिअ‍ॅलिटी शोच्या वेळी अभिनेत्री तबस्सुम यांनी सुनिधीमधील टॅलेंट ओळखले आणि तिच्या आई वडिलांना मुंबईला येण्यास सांगितले. मुंबईला आल्यानंतर सुनिधीने दूरदर्शनच्या ‘मेरी आवाज सुनो’ या शोचे विजेतेपद पटकावले आणि मानाची लता मंगेशकर ट्रॉफी मिळवली. मग मात्र सुनिधीने मागे वळून पाहिलेच नाही. तिची गाडी सुसाट वेगाने निघालीच.

वयाच्या सोळाव्या वर्षीच तिने रामगोपाल वर्माच्या ‘मस्त’ या चित्रपटाची गाणी मस्तीत गायली. त्यानंतर एकापाठोपाठ एक अशी सरस गाणी सुनिधीने दिली. ‘रुकी रुकी सी जिंदगी’, ‘धूम मचाले’, ‘शीला की जवानी’, ‘क्रेजी किया रे’, ‘देसी गर्ल’, ‘दीवानगी दीवानगी’ अशा असंख्य गाण्यांनी सुनिधीने रसिकांना मोहून टाकले.

हिंदी व्यतिरिक्त तिने मराठी, कन्नड़, तेलुगु, तमिळ, पंजाबी, बंगाली, आसामी, नेपाळी आणि उर्दू मध्ये सुद्धा गाणी म्हटली. ‘रुकी रुकी सी जिंदगी’ या गाण्यासाठी सुनिधीला फिल्मफेयर अवॉर्ड मिळाले. आजवर तिने 3000 पेक्षा जास्त गाणी गायली आहेत.

गाण्यांशिवाय सुनिधी एक फॅशन आयकॉन म्हणून पण ओळखली जाते. 2013 मध्ये अशियातील टॉप 50 सेक्सिएस्ट लेडीज मध्ये तिने स्थान मिळवले होते. खरंतर सुनिधीचे खरं नाव निधी असं आहे. पण असं म्हणतात की कल्याणजी आनंदजी यांच्या बरोबर काम करणा-या यशस्वी कलाकाराचे नाव ‘स’ ने सुरु होते. म्हणून निधीची सुनिधी बनली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.