Birthday Wishes To Sonu Nigam: ‘अच्छा सिला दिया’पासून सुरु झालेला गाण्यांचा सिलसिला आजही कायम

Birthday Wishes To Singer Sonu Nigam वयाच्या 18 व्या वर्षी सोनू वडिलांबरोबर मुंबईला आला. त्याने उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्याकडे गाण्याचे शिक्षण घेतले. त्याचदरम्यान तो स्टेज शो करत होता.

एमपीसी न्यूज – दिग्गज गायक मोहम्मद रफी, किशोरकुमार यांच्यानंतर कोण असा प्रश्न जेव्हा पडला होता, तेव्हा आपल्या प्रसन्न आवाजाने एका युवा गायकाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्याचा सुरेल, तयारीचा आवाज लोकांना सिनेसंगीताच्या सुवर्णकाळात घेऊन गेला. आणि दर्जेदार संगीताची हिंदी चित्रपटसृष्टीची परंपरा कायम राहिली. हा तो तेव्हाचा युवा गायक आज दिग्गज बनला असून त्याच्या गाण्यातून तो आपल्याला आजही सुखावत असतो. गायक सोनू निगम याचा आज वाढदिवस. त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

हरयाणातील फरिदाबाद येथे जन्मलेल्या सोनूला घरातूनच संगीताचे बाळकडू मिळाले होते. वडील आगम निगम हे स्वत: उत्तम गायक होते. त्यांच्या सोबत स्टेज शोमध्ये सोनू लहानपणापासूनच गात असे. आज सोनू जरी यशस्वी पार्श्वगायक असला तरी एके काळी तो लग्नसमारंभांमध्ये देखील गात असे.

सोनूचे वडील रफीसाहेबांचे भक्त होते. त्यांचा आवाजपण त्यांच्याशी मिळताजुळता असल्याने ते तीच गाणी गात. त्यामुळे सोनूला देखील अशा प्रकारच्या गाण्यांची गोडी लागली. मात्र पुढे जाऊन सोनूने आपल्या आवाजाने रसिकांवर मोहिनी घातली.

वयाच्या 18 व्या वर्षी सोनू वडिलांबरोबर मुंबईला आला. त्याने उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्याकडे गाण्याचे शिक्षण घेतले. त्याचदरम्यान तो स्टेज शो करत होता.

मात्र 1995 मध्ये सोनूने ‘सारेगामा’ या संगीतविषयक रिअ‍ॅलिटी शोचे सूत्रसंचालन केले. त्याचे ते सुंदर, ओघवते आणि सहज असे सूत्रसंचालन पाहून त्यावेळचे म्युझिक जायंट असलेले ‘टी सिरीज’ या कंपनीचे सर्वेसर्वा गुलशनकुमार यांनी सोनूला गाण्याची संधी दिली. ‘बेवफा सनम’ या चित्रपटातील त्याचे ते गाणे प्रचंड गाजले. ते गाणं होतं, ‘अच्छा सिला दिया तून मेरे प्यार का’…

त्यानंतर सोनूने मागे वळून पाहिलेच नाही. एकापेक्षा एक सरस गाणी त्याने दिली. त्यातच ‘बॉर्डर’ या चित्रपटातील गाणी सुपरहिट ठरली. ‘तुमसे मिलके दिल का है जो हाल’, ‘अखियोंसे गोली मारे’, ‘मुझसे शादी करोगी’, ‘सूरज हुआ मथ्थम’, ‘दिल ने ये कहा हैं दिलसे’ या सारखी अनेक गाणी सोनूने आपल्या आवाजाने वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली.

हिंदी व्यतिरिक्त त्याने इंग्रजी, कन्नड, बंगाली, उडिया, पंजाबी, तामिळ, मैथिली, भोजपुरी, नेपाळी आणि मराठीमध्ये देखील गाणी गायली आहेत. त्याचे सचिन पिळगावकर यांच्या ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटातील ‘हिरवा निसर्ग हा भवतीने’ हे गाणे प्रचंड गाजले.

सोनूला अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले आहे. आयफा, फिल्मफेअर, एमटीव्ही, जीमा असे विविध पुरस्कार मिळाले आहेत. तसेच ‘कल हो ना हो’ या चित्रपटातील टायटल साँगसाठी राष्ट्रीय पुरस्काराची मोहोर देखील उमटवण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.