Pimpri News: भाजप संलग्न अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपशी संलग्न अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास उर्फ बाबा बारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी आज (गुरुवारी) मुंबईत हातावर घड्याळ बांधले. संलग्न असलेल्या आघाडीचा गटनेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्याने महापालिकेतील सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला आहे.

मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात हा प्रवेश सोहळा झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, संतोष बारणे,अभय मांढरे, माजी नगरसेवक सतीश दरेकर,
ऋषिकेश काशिद, योगेश साळुंखे, प्रविण बारणे, शहाजी लोखंडे, अक्षय बारणे, तुषार मोरे उपस्थित होते.  बारणे यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत कैलास बारणे अपक्ष निवडून आले आहेत. चार सदस्यांचा मोठा प्रभाग असतानाही बारणे हे प्रभाग क्रमांक 23 थेरगाव गावठाणमधून अपक्ष निवडून आले. त्यानंतर त्यांनी पाच अपक्ष नगरसेवकांची आघाडी केली. ही आघाडी सत्ताधारी भाजपशी संलग्न झाली.

बारणे हे स्थायी समितीचे सदस्य देखील होते. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातावर बांधले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे आहे. पदाची कोणतीही अपेक्षा न ठेवता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे कैलास बारणे यांनी एमपीसी न्यूजशी बोलताना सांगितले. आघाडीतील सहकाऱ्यांशी अद्यापपर्यंत आपले बोलणे झाले नसल्याचेही त्यांनी सांगितले.

अभय मांढरे यांनी सांगितले की, सुडाचे राजकारण करणार नाही. विकासाचे आणि बेरजेचे राजकारण केले जाणार आहे.

दरम्यान, भाजपच्या जेष्ठ नगरसेविका माया बारणे यांचे पती महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे, भाजपच्या पिंपळेगुरव प्रभाग क्रमांक 29 च्या नगरसेविका, महिला व बालकल्याण समिती सभापती चंदा लोखंडे यांचे पती आणि माजी नगरसेवक राजू लोखंडे यांनी अद्यापपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपला गळती सुरू झाल्याचे बोलले जाऊ लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.