Akurdi : महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपचे मंगळवारी आंदोलन

एमपीसी न्यूज – राज्य सरकारच्या बेफिकीरीमुळे महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याचा आरोप करत भाजपतर्फे येत्या मंगळवारी (दि. 25) सकाळी 11 वाजता आकुर्डीतील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. प्रदेश नेतृत्वाच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात येत आहे, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी आज (शनिवारी) पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी महापौर उषा ढोरे, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, सभागृह नेते नामदेव ढाके, उमा खापरे, सदाशिव खाडे, अमित गोरखे, एकनाथ पवार, सीमा सावळे, बाबू नायर, माऊली थोरात, अमोल थोरात, मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे,  संजय मंगोडेकर, विजय फुगे, शैला मोळक, आशा शेंडगे आदी उपस्थित होते.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेल्या महिनाभरात राज्यातील महिलांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. अॅसिड हल्ला, अल्पवयीन मुलींवर अत्याचार, बलात्कार, महिलांना जाळून टाकणे अशा घटना वाढू लागल्यामुळे महिला व तरूण मुलींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप आमदार लांडगे यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.