Pune News : एचसीएमटीआरच्या मार्गात बदल करण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीची युती?

एमपीसी न्यूज – शहरातील एचसीएमटीआर (उच्च क्षमता द्रुतगती मार्ग)प्रकल्पाच्या मार्गिकेमध्ये तीन ठिकाणी बदल करण्याचा प्रस्ताव मंगळवारी मुख्य सभेत मान्य करण्यात आला. यानिमित्ताने दररोज एकमेकांवर टीका करणारे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याचे पहायला मिळाले. काँग्रेस,मनसे आणि शिवसेना यांनी मात्र या बदलाला विरोध केला. पुणे शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यामध्ये 24 मीटरचा एचसीएमटीआर प्रस्तावित आहे. याला महापालिकेच्या मुख्यसभेने मान्यता दिली आहे.

या प्रस्तावावर हरकती सुचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार महापालिका प्रशासनाने सुनावणी व अभिप्रायानुसार कोथरुड, कर्वेनगर, वडगावशेरी आणि लोहगाव याठिकाणी बदल करण्यासाठी मुख्यसभेसमोर प्रस्ताव ठेवला होता. यावरील निर्णयासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांनी खास सभेची मागणी केली होती. काल ही खास सभा पार पडली आणि या सभेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी युती पहायला मिळाली.

याप्रस्तावाला भाजपचे नगरसेवक उमेश गायकवाड आणि आदित्य माळवे यांनी गांधीभवन ते अलंकार पोलिस चौकी या मार्गिकेत बदल करु नये अशी उपसुचना दिली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल टिंगरे, प्रशांत जगताप आणि दत्तात्रय धनकवडे यांनी हा रस्ता लोहगाव विमानतळापर्यंत वाढवावा अशी उपसुचना देण्यात आली होती. नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी सुध्दा स्वारगेट येथील मार्गिकेमध्ये बदल करण्यासाठी उपसुचना दिली होती. तीनही उपसुचनांसह प्रस्ताव खास सभेत मान्य करण्यात आला.

खास सभेमध्ये याविषयावर वादळी चर्चा झाली. मनसेचे गटनेते वसंत मोरे आणि काँग्रेसचे गटनेते आबा बागूल यांनी याविषयाची संपुर्ण माहिती देण्याची मागणी सभागृहात केली. मात्र उपसुचना आणि मुख्यविषय मान्य झाल्यानंतरच याविषयाची माहिती सभगृहात देण्यात आली. यावेळी आबा बागूल म्हणाले, ठराविक बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी मार्गामध्ये बदल करण्यात येत आहेत. यामुळे पावणेदोन लाख चौरस फुट क्षेत्र हे निवासी करण्यात आले आहे. त्यामुळे याविषयाला आमचा विरोध आहे. वसंत मोरे यांनी वारंवार सभागृहात अगोदर माहिती देण्याची मागणी केली मात्र शेवटपर्यंत माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे चिडलेल्या मोरे यांनी सभागृहातच कार्यपत्रिका फाडून टाकली.

उपसुचनेवर मतदान पुकारण्यात आल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र झाली .त्यामुळे 78 विरुध्द 16 मतांनी प्रस्ताव मान्य करण्यात आला. त्यामुळे महापालिकेच्या सभागृहात राष्ट्रवादी आणि भाजप यांचा शपथविधी कधी झाला अशी विचारणा मनसेकडून करण्यात आली. त्यामुळे फायद्याच्या प्रस्तावासाठी भाजप राष्ट्रवादी युती झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे राष्ट्रवादीकडुन भाजपच्या कारभारावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याकडुन भाजपच्या कारभाराचे वाभाडे काढले जात आहेत. कोथरुडची नेतेमंडळी राष्ट्रवादीच्या वरीष्ठ नेत्यांवर गैरव्यवहाराचे आरोप करत आहे. मात्र असे असताना फायद्याचे विषय आल्यानंतर दोन्ही पक्षांनी एकत्र येत एचसीएमटीआर प्रकल्पाच्या मार्गिकेमध्ये तीन ठिकाणी बदल करून घेण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.