Mumbai: भाजपकडून विधानपरिषदेसाठी गोपछेडे, दटके, पडळकर, मोहिते यांना उमेदवारी जाहीर

पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यांच्या नावावर फुली

एमपीसी न्यूज – भाजपकडून विधानपरिषदेसाठी डॉ. अजित गोपछेडे, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यांची उमेदवारी आज (शुक्रवारी) जाहीर करण्यात आली आहे. आज चारही उमेदवार दुपारी 2 वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहेत. दरम्यान, पक्षाने एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यांच्या नावावर फुली मारली आहे.

भाजपने शर्यतीत असलेल्या उत्सुक नेत्यांना धक्का देत, निष्ठावंतांना पुन्हा एकदा डावलल्याचं चित्र आहे.

विधानपरिषदेसाठी भाजपने माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये आले होते. तर गोपीचंद पडळकर यांनी विधानसभा निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढली होती. बारामतीत त्यांचा अजित पवारांकडून मोठ्या फरकाने पराभव झाला होता. याशिवाय नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि भाजपच्या मेडिकल सेलचे अध्यक्ष असलेले नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांना उमेदवारी दिली आहे.

कुणाचं संख्याबळ काय?

सध्या ज्या जागा रिक्त झाल्यात त्यात भाजपच्या 3, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3, काँग्रेसच्या 2 आणि शिवसेनेची 1 अशा एकूण 9 जागांचा समावेश आहे. संख्याबळाचा विचार केला तर महाविकासआघाडीच्या 5 आणि भाजपच्या 3 जागा सहज निवडून येतील. पक्षीय बलाबल लक्षात घेता भाजपकडे 105, शिवसेनेकडे 56, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 54, काँग्रेसचे 44, बहुजन विकास आघाडी 3, समाजवादी पार्टी 2, एमआयएम 2, प्रहार जनशक्ती 2, मनसे 1, माकप 1, शेतकरी कामगार पक्ष 1, स्वाभिमानी पक्ष 1, राष्ट्रीय समाज पक्ष 1, जनसुराज्य पक्ष 1, क्रांतिकारी शेतकरी पक्ष 1, अपक्ष 13 आमदारांचा समावेश आहे. त्यातून निवडून येण्यासाठी एका जागेसाठी 29 मतांची गरज आहे. त्यामुळे या निवडणुकीत एका जागेसाठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

विधानपरिषदेची निवडणूक कधी?

कोरोनामुळे रखडलेल्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. 11 मार्च अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. येत्या 21 मे रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्याच दिवशी म्हणजे 21 तारखेलाच मतमोजणी आणि निकाल जाहीर होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.