Chinchwad/Bhosari : निवडणूक खर्चात भाजप उमेदवारांची आघाडी!
महेश लांडगे यांचा दोन लाख तर लक्ष्मण जगताप यांचा दीड लाख खर्च
एमपीसी न्यूज – चिंचवड आणि भोसरी मतदारसंघातील भाजप उमेदवारांनी पहिल्या टप्प्यात खर्चात आघाडी घेतली आहे. भोसरीचे भाजप उमेदवार महेश लांडगे यांनी सर्वाधिक दोन लाख रुपये तर लक्ष्मण जगताप यांचा दीड लाखाचा खर्च केला आहे.
उमेदवारी अर्ज भरल्यापासून उमेदवारांचा खर्च मोजाला जातो. प्रचारावर खर्च करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रत्येक उमेदवाराला 35 लाखांची मर्यादा आखून दिली आहे. या मर्यादेतच उमेदवारांना आपला खर्च करायचा आहे. उमेदवारांना निवडणूक प्रचार संपण्यापूर्वी तीन वेळा खर्चाची माहिती सादर करावी लागणार आहे. उमेदवारांवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक विभागाकडून प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये व्हिडिओ सर्व्हिस टीम (व्हीएसटी) गठीत करण्यात आली आहे. ही टीम प्रत्येक उमेदवाराच्या सभा व प्रचाराचे चित्रीकरण करत आहेत. तर, उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाची उलट तपासणी निवडणूक आयोगाच्या यंत्रणा (एसओआर) करत आहेत.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात 11 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. चिंचवड मतदारसंघामध्ये भाजपचे लक्ष्मण जगताप यांनी सर्वाधिक एक लाख 43 हजार 600 रुपये खर्च केला आहे. यामध्ये अर्ज भरण्यासाठी काढलेली रॅली, त्यातील विविध पथके, फटाके, हार, याबरोबरच प्रचारातील गाड्यांचा खर्च ग्राह्य धरण्यात आला आहे. तर, अपक्ष राहुल कलाटे यांनी अत्तापर्यंत केवळ अर्ज भरण्यासाठी जाताना तसेच प्रचारासाठी लागणारे साहित्य यासाठी केवळ 24 हजार 650 रुपये खर्च केला आहे. उमेदवारांनी नोंदवहीमध्ये लावलेला खर्च व निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी निरीक्षण केलेल्या खर्चाचा ताळमेळ लावला असून कोणत्याही उमेदवारांच्या खर्चामध्ये तफावत आढळून आली नाही.
भोसरी विधानसभेसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यापैकी 11 उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर पहिल्या टप्प्यातील निवडणूक खर्च सादर केला आहे. त्यानुसार भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांनी सर्वाधिक 2 लाख 40 हजार 592 रुपये खर्च केला आहे. लांडगे यांनी 1 लाख 96 हजार 492 रुपयांचा खर्च नोंदविला होता. परंतु, एसओआरच्या तपासणीत खर्चात 1 लाख 58 हजार 81 रुपयांची तफावत आढळून आली. ही तफावत लांडगे यांनी मान्य केली आहे.
आमदार लांडगे यांच्या खालोखाल अपक्ष उमेदवार विलास लांडे यांनी 84 हजार 555 रुपयांचा खर्च झाल्याचे म्हटले आहे. उर्वरीत उमेदवारांचा खर्च 20 हजार रुपयांच्या आत झाला आहे. तर, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शाहनवाज शेख यांनी खर्च सादर केलेला नाही.