Pimpri : भाजप नगरसेविकेचा शिवसेनेचे कार्यालय बळकाविण्याचा प्रयत्न; शिवसेनेचा आरोप 

नगरसेविकेने आरोप फेटाळले 

एमपीसी न्यूज –  पिंपरी, महात्मा फुलेनगर येथे गेल्या 35 वर्षांपासून शिवसेनेच्या शाखेचे कार्यालय आहे. पालिकेच्या झोनिपू विभागाकडे ‘शिवसेना ऑफिस’ अशी नोंदणी असून मिळकत कराची पावती देखील आहे, असे असताना भाजपच्या नगरसेविका सीमा सावळे यांनी कार्यालय बळकाविण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप, शहर शिवसेनेने केला आहे. तसेच याबाबत कार्यालयाचा ताबा मिळण्यासाठी पोलिसांकडे रितसर तक्रार दिली असल्याचेही, त्यांनी सांगितले. दरम्यान, नगरसेविका सीमा सावळे आणि भाजपचे सरचिटणीस सारंग कामतेकर यांनी आपल्याला हीन दर्जाची भाषा वापरुन धमकी दिल्याचा आरोप शिवसेनेचे पिंपरी संघटक जितेंद्र ननावरे यांनी केला. दरम्यान, सीमा सावळे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 

पिंपरीत आज (मंगळवारी) झालेल्या पत्रकार परिषदेला शहरप्रमुख योगेश बाबर, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरसंघटिका सुलभा उबाळे, चिंचवड विधानसभाप्रमुख अनंत को-हाळे, भोसरी धनंजय आल्हाट, पिंपरी विधानसभेचे संघटक जितेंद्र ननावरे आदी उपस्थित होते.

माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे म्हणाले, महात्मा फुलेनगर येथे 35 वर्षांपासून शिवसेनेची शाखा आहे. शिवसेनेत असताना सीमा सावळे यांनी कार्यालयाचा वापर केला. तथापि, लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात प्रचार केल्यामुळे त्यांची हकालपट्टी केली होती. त्यामुळे शाखेचा ताबा त्यांनी शिवसेना पदाधिका-यांच्या ताब्यात देणे गरजेचे होते. परंतु, देण्यात आले नाही. दरम्यानच्या काळात सावळे यांनी कार्यालयाची किल्ली माझ्याकडे दिली होती. परंतु, मी शिवसेनेत नसल्यामुळे कार्यालय उघडले नव्हते. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर स्थानिक शिवसैनिकांच्या मागणीनुसार 19 जुलै 2018 रोजी मी शाखेचे कार्यालय उघडले होते. किल्ली सापडत नसल्यामुळे कार्यालय तोडून साफसफाई करण्यासाठी त्याची पाहणी केली.

त्यानंतर सायंकाळी सीमा सावळे यांनी दूरध्वनी करुन मला दमबाजी केली. हीन दर्जाच्या भाषेचा वापर केला. शिवीगाळ करण्यात आली. दहशतीचा वापर करुन त्यांनी मला घाबरविण्याचा प्रयत्न केला. यांच्या दहशतीला घाबरुन आजपर्यंत अनेक जण शांत बसले आहेत. परंतु, मी घाबरणार नसून लढणार असल्याचे, ननावरे यांनी सांगितले. सावळे यांच्यासोबत सारंग कामतेकर होते. ते सावळे यांना बोलण्यासाठी प्रेरित करत होते. त्यांनी मध्येच फोन घेऊन मला दमबाजी केली. कायदा शिकवतो. मारामारी करायला आम्ही कमी नाहीत, असे सांगितले.

तसेच मी बांधलेल्या कार्यालयाची तोडफोड करण्याची धमकी दिली. सावळे, कामतेकर यांनी दहा वर्षात दहशतीचे राजकारण केले असून आता त्यांच्या ‘पापाचा’ घडा भरला असल्याचे सांगत ननावरे म्हणाले, याबाबत पिंपरी ठाण्यात रितसर तक्रार दिली आहे. लवकरच कडक कारवाई करण्याची मागणी करणार आहे. तसेच माझ्यासोबत झालेल्या संभाषणाची ‘अॅडिओ’ क्लिप पोलिसांना दिली आहे. मी दलित कार्यकर्ता असल्याचे कामतेकर यांना माहित होते, तरी देखील त्यांनी मला दमबाजी केली. त्यामुळे त्यांच्यावर ‘अॅट्रासिटी’चा गुन्हा दाखल करण्याची मागणीही ननावरे यांनी केली.

शहरप्रमुख योगेश बाबर म्हणाले, ‘कार्यालय शिवसेनेच्या नावाने आहे. त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. कागदपत्रांसह आम्ही पोलिसांकडे तक्रार दिली असून मिळकतकराची पावती देखील आमच्याकडे आहे. वीज बिल केवळ त्यांच्या नावावर आहे. त्यांनी खोटी कागदपत्रे देऊन वीज बिल नावावर करुन घेतले आहे. कार्यालयाची किल्ली पोलिसांच्या ताब्यात आहे. शिवसेनेचे कार्यालय असल्यामुळे कार्यालय देण्याची मागणी आम्ही केली आहे’.

नगरसेविका सीमा सावळे म्हणाल्या, जितेंद्र ननावरे यांनी 19 जुलै 2018 ला माझ्या कार्यालयाचे कुलूप तोडले. कार्यालयातून पैसै, महत्वाची कागदपत्रे नेली आहेत. याबाबत आम्ही पोलिसांना कळविले होते. त्यानंतर एमआयडीसीचे पोलीस अधिकारी घटनास्थळी आले होते. त्यावेळी ननावरे यांनी दुस-या कार्यकर्त्यांच्या मोबाईलवरुन मला फोन केला आणि अर्वाच्च भाषेत बोलण्यास सुरुवात केली. दमबाजी करुन फोन कट केला. त्यानंतर मी स्वत: ननावरे यांच्या मोबाईलवर फोन केला. ननावरे यांनी अर्वाच्च भाषा वापरल्यामुळे मी त्यांना जशास तसे उत्तर दिले.

तोडफोड प्रकरणी ननावरे यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल होत होता. त्यावेळी ते आमच्या हाता-पाया पडले. आम्ही तक्रार केल्याची पोलिसांकडे नोंद आहे. ते कार्यालय शिवसेनेचे नसून सारंग कामतेर यांनी बांधले आहे. आम्ही शिवसेनेत होतो, म्हणून ते शिवसेनेचे कार्यालय होते. ननावरे यांनी कटकारस्थान केले आहे. त्यांना ती जागा हडपायची आहे. ते भाजपात आले असताना आम्ही त्यांना किल्ली दिली होती. ते शिवसेनेत गेल्यानंतर आम्ही कार्यालयाचे कुलूप बदलले. त्यामुळे त्यांनी कुलूप तोडले. यावरुन ननावरे यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल होत होता. त्यामुळे आठ दिवस ते आमच्या हाता-पाया पडत होते. आम्ही 1994 पासून 2017 पर्यंत शिवसेनेत होतो. ननावरे यांनी अर्धवट संभाषण रेकॉर्ड केले आणि तेवढेच समोर आणले. आता मी संपूर्ण संभाषण समोर आणण्याची मागणी करणार आहे. एखाद्या महिलेसोबोत असभ्य भाषेत ते कसे बोलू शकतात. त्यांनी स्त्री जातीचा अपमान केला आहे.

कामतेकर यांनी अर्वाच्च भाषा वापरली नाही. तुमच्यापेक्षा मला कायदा जास्त कळतो असे सांगतिले. कायद्यात शिकवतो एवढेच म्हणाले. मी मागासवर्गीय असून महिला म्हणून मला संधी मिळाली. त्यामुळे त्यांच्या पोटात दुखत आहे. कार्यालय सारंग कामतेकर यांनी बांधले आहे, हे सर्वांना माहित आहे. परंतु, ननावरे यांनी तिथे जबरदस्तीने घुसून दरोडा टाकला आहे. ननावरे कार्यालयातील फोटो देखील घेऊन गेले आहेत. त्याचा गैरवापर झाल्यास त्याला सर्वस्वी तेच जबाबदार राहतील. याबाबत मी पोलिसांकडे माझे म्हणणे मांडणार असून ननावरे यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.