Pimpri News: भाजप नगरसेवकांकडून खासदारांसमोर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची पोलखोल!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी हजेरी लावल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा आवाज घुमला. अभावानेच, दिखाऊ विरोधी भूमिका घेणा-या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची कालची भूमिका पाहून सत्ताधा-यांनी टोले लगाविले. राष्ट्रवादीचे नगरसेवक विरोध करत नाहीत. सभागृहात बोलत नाहीत. निरीक्षक आले म्हणून आज बोलत आहे. स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचाराविरोधात मला पत्र द्यावे लागले. संचालक असलेल्या विरोधी पक्षनेत्याने पत्र का दिले नाही. प्रशासनाच्या आणि भाजपच्या भ्रष्टाचारात सहभागी होणार नाही असे सांगत राजीनामा देऊन बाहेर पडायला पाहिजे होते. का बाहेर पडले नाही? असा सवाल करत ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांनी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांची पोलखोल केली.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी हजेरी लावल्याने राष्ट्रवादीचे नगरसेवक बुधवारी आक्रमक पवित्र्यात होते. महासभेत अभावानेच विरोधी भूमिका घेणारे राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक झालेले पाहून, सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनीही त्यांचे अभिनंदन केले. स्मार्ट सिटी भ्रष्टाचार, रस्ते खोदाई, आयुक्तांची कार्यपद्धती या सर्व गोष्टींवर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी जोरदार टीका केली. या सर्व प्रकारामुळे खासदारांच्या उपस्थितीने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना आवाज फुटला, अशी चर्चा महापालिका वर्तुळात रंगली होती. सत्ताधारी भाजप नगरसेवकांनीही विरोधी पक्षातील नगरसेवकांची पोलखोल केली.

ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे म्हणाले, ”खासदारसाहेब राष्ट्रवादीचे नगरसेवक विरोध करत नाहीत. सभागृहात बोलत नाहीत. स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचाराविरोधात मी पत्र दिले. विरोधी पक्ष म्हणून तुम्ही पत्र का दिले नाही. स्मार्ट सिटीवर संचालक असलेल्या विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी प्रशासनाच्या आणि भाजपच्या भ्रष्टाचारात सहभागी होणार नाही असे सांगत राजीनामा देऊन बाहेर पडायला पाहिजे होते. राजीनामा देऊन नैतिकता दाखवायला पाहिजे होती. स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचाराला संचालक मंडळ जबाबदार आहे. राज्यात तुमची सत्ता आहे. स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचारावर कारवाई करुन दाखवा”.

भाजपचे संदीप वाघेरे म्हणाले, ”ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांनी भाजपच्या आमदारांवर टीका करताना या आमदारांनी दुकान नव्हे तर मॉलच थाटल्याचा आरोप केला. पण, खासदार साहेब या मॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचीही तीन ते चार दुकाने आहेत. लुटुपटुचा विरोध करुन चिरीमिरी घेऊन त्यांचा उदरनिर्वाह सुरु आहे. याकडेही लक्ष द्या”

भाजपचे विकास डोळस म्हणाले, ”विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसने साडेचार वर्षात घोटाळे बाहेर काढायला पाहिजे होते. केवळ मोघम आरोप करत राहिले. साडेचार वर्षे विरोधक गप्प होते. आता निरीक्षक आले म्हणून बोलत आहेत. स्मार्ट सिटीतील घोटाळा भाजपच्या नगरसेविका सीमा सावळे यांनी काढला. विरोधकांनी काढला नाही. स्मार्ट सिटीवर महापौर, सत्तारुढ पक्षनेते, विरोधी पक्षनेते, शिवसेनेचा एक सदस्य आणि मनसेचा गटनेते आहेत. यांना स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचार का दिसला नाही. राजीनामा का दिला नाही. तांत्रिक मान्यतेशिवाय 250 कोटी रुपयांचे काम देणा-या अधिका-यांवर कारवाई करावी. तसेच प्रशासनाकडून आमच्या पत्राची दखल घेतली जात नाही. पालिकेचे विश्वस्त असूनही आम्हाला आयुक्तांच्या दालनात जायला परवानगी घ्यावी लागते. यापुढे खपवून घेतले जाणार नाही”.

भाजपचे राहुल जाधव म्हणाले, ”खासदार साहेब तुम्ही हजर असल्यामुळे तुमच्या पक्षाचे नगरसेवक आज जास्त बोलत आहेत. आम्हाला माहिती असते. तर, प्रत्येक सभेला मी तुम्हाला बोलविले असते. उठा उठा दिवाळी आली. मोती साबणाने अंगोळ करण्याची वेळ झाली या जाहिरातीची मला आठवण झाली. उठा उठा निवडणूक आली. विरोध करण्याची वेळ आली असे सांगत त्यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना टोला लगाविला”.

दरम्यान, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ म्हणाले, ”स्मार्ट सिटी संदर्भात मी नऊ पत्रे दिली आहेत. शहराचे दोन भाग झाले आहेत. उजवी बाजू तुझी आणि डावी बाजू माझी अशी वाटणी झाली आहे. दबावामुळे महापालिकेच्या एका कार्यकारी अभियंत्याचे मूत्यू झाला. स्मार्ट सिटीच्या एकाही प्रकल्पाच्या नागरिकांना लाभ झाला नाही. सर्व भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे. 8 ते 10 दिवसात चौकशीचे पत्र येईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.