Pune : महापालिकेच्या अर्थसंकल्पाचे भाजप नगरसेवकांनी केले कौतुक, तर विरोधी पक्षांनी घेतला खरपूस समाचार

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी 2020 – 21 च्या सादर केलेल्या अर्थसंकल्पावर सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी जोरदार समर्थन केले. तर, विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी खरपूस समाचार घेतला. सोमवारी सकाळी या अर्थसंकल्पावर खास सभा आयोजित केली होती.

अजय खेडेकर म्हणाले, मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडीचा प्रश्न निकालात काढण्यासाठी 10 रुपयांत प्रवास करता येणार आहे. मेट्रो प्रकल्प पूर्णत्वास आला असून, त्यामुळे पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार आहे. शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो वेळेत पूर्ण होईल. ही मेट्रो माझ्या प्रभागातून जात आहे, सीसीटीव्ही, जॉगिंग ट्रॅक केले. हेमंत रासने यांनी संपूर्ण शहराच्या विकासाचे समतोल साधणारे बजेट केले.

सचिन दोडके म्हणाले, एनडीएच्या छोटाशा विमानतळामुळे बांधकामे थांबली आहेत. जेवढा अंदाज व्यक्त केलाय तेवढा निधी जमा होणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अनधिकृत बांधकामे वाढत आहेत, 30 टक्के उत्पन्न बांधकाम क्षेत्रातून मिळते. वारजे आंबेडकर चौकात उड्डाणपूलच गायब केला, तो बजेटमध्ये का आला नाही, महापालिका आयुक्तांनी या चौकात भेट दिली होती. 10 – 10 वर्षे इमारतीला स्टे आहे, तर विधी खाते करते काय, आंबेडकर चौकात अर्धा तास वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते, लाखो लोक या चौकातून जातात, या रस्त्याला का बजेट नाही, सिंहगड रस्त्यावर उड्डाणपूल का होत नाही, संबंधित अधिकाऱ्यांना घरी बसवा, शिवणे – खराडी रस्त्याचा मोबदला कसा देणार, चांदनी चौक उड्डाणपूल परिसरात बिडीपी आहे, 12 मीटर रस्ते कसे होणार, न्यायालयात कोणीही गेला तर अडचणी निर्माण होतील, असेही त्यांनी सांगितले.

प्रवीण चोरबेले म्हणाले, पुणे शहराची 25 लाख लोकसंख्या आता 40 लाखांवर गेली आहे. मिडी बसचा प्रस्ताव चांगला आहे, 10 रुपयात कुठेही फिरता येईल. 72 कोटी त्यासाठी तरतूद करण्यात आली आहे, 25 सप्टेंबरला जो महापूर आला. त्यामध्ये नागरिकांचे मोठे नुकसान झाले, संरक्षण भिंत असावी, यासाठी हेमंत रासने यांनी पुढाकार घेतला. महापौर चषक स्पर्धा झाल्यात. योगाचे महत्व वाढत चालले, पुष्पक शववाहिनी 15 क्षेत्रीय कार्यालयात असाव्यात, सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळेल, महसूल विभागाची स्वतंत्र कक्ष स्थापन केला, मोबाईल कंपन्या, होल्डिंगमधून मोठ्या प्रमाणात कर वसूल करता येईल, मागील 3 वर्षात अनेक विकासकामे झाली आहेत, वारकरी भवन, असे अनेक महत्वपूर्ण प्रकल्प या अंदाजपत्रकात आहेत. तर, नियोजित वाय उड्डाणपूलाची लांबी वाढवावी. आई माता लक्ष्मी चौक ते सेव्हनलव्हज् चौकापर्यंत उड्डाणपूल असावा, अशी मागणीही त्यांनी केली.

आदित्य माळवे म्हणाले, स्मार्ट – इ लायब्ररी विद्यापीठ चौकात होणार आहे, उड्डाणपूल परिसरात वाईट परिस्थिती आहे. पीएमपीएमएलमुळे मध्यवर्ती भागांत वाहतूक कोंडी होते. मिडीबसवर भर देण्यात यावा, महापालिकेच्या उत्पन्नाच्या स्रोतात वाढ व्हावी.

भाजपचे नगरसेवक हरिदास चरवड, जयंत भावे, सुशील मेंगडे, युवराज बेलदरे, महेश वाबळे, नगरसेविका राणी भोसले, स्वाती लोखंडे, राजश्री काळे यांनीही आपले मत व्यक्त केले.

गणेश ढोरे म्हणाले, 11 गावांसाठी केवळ 96 कोटी दिले. तर, 125 कोटी कचरा डेपोला दिले. गावांना प्राधान्य देण्यात आले नाही. 24 बाय 7 योजना पाणी लागू केली नाही. डांबरी रस्ते उखडून काढायचे आणि सिमेंट काँक्रेटिकरण करण्याचा उद्योग सुरू आहे. 2 लाख 15 हजार लोकसंख्येचा आमचा प्रभाग आहे.  प्रभाग, बजेट तरतूद पुरेशी नाही, ग्रामपंचायतमध्ये राजकारण चालायचे, पण येथेही असेच राजकारण होत आहेत.

दरम्यान, नवीन 11 गावांत अतिशय कमी तरतूद असल्याने ती वाढवून देण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दीपाली धुमाळ यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.