Pimpri : वायसीएममधील नियमबाह्य पदभरतीची नगरसेवक संदीप वाघेरे यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएमएच रुग्णालयात अनागोंदी कारभार सुरु आहे. कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या अधिकार्‍याला नियमबाह्य पद्धतीने अधिकार देण्यात आले आहेत. तसेच गरज नसतनाही वैद्यकीय महाविद्यालयात कायमस्वरूपी पद्धतीने पदे भरण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करत सर्व निर्णय रद्द करण्याची मागणी भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे यांच्यासह विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

याबाबत वाघेरे आणि काटे यांनी स्वतंत्र निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविले असून त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येत आहे. यासाठी शासनाने पदे भरण्यास मान्यता दिली असून सध्या या पदांची भरती कंत्राटी पद्धतीने ११ महिने ते ३ वर्षे कालावधीसाठी भरण्यात येत आहेत. मात्र महापालिका प्रशासन आणि सत्ताधा-यांनी ही पदे कंत्राटी पद्धतीने न भरता अचानकपणे कायमस्वरूपी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ही पदे भरण्याबाबत जाहिरातही प्रसिद्ध केली आहे.

जी जाहिरात प्रसिद्ध केली आहे त्यातील पन्नास पदे ही कायमस्वरूपी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. यातील गरजेची पदे सध्या कंत्राटी पद्धतीने भरलेली असताना हा नव्याने प्रकार कशासाठी चालविला आहे? हे कळून येत नाही. महापालिकेच्या वैद्यकीय विभागासाठी गरजेची पदे भरण्यास आमची हरकत नसून नव्याने भरण्यात येणा-या पदांबाबत आमची हरकत आहे. ही पदे भरल्यास महापालिकेवर प्रचंड मोठा अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे. विशेष म्हणजे यातील काही पदे ही सध्या कार्यरत असलेल्या अधिका-यांच्या मर्जीतील लोकांना सामावून घेण्याच्या उद्देशानेही काढण्यात आलेली आहे, असा आरोप करण्यात आला आहे.

पदभरती संशयास्पद- वाघेरे
पदभरतीबाबत आक्षेप नाही मात्र जी पदे भरली जाणार आहेत ती पदे उच्च अस्थापनेवरील आहेत. रुग्णालयातील नोंदीनुसार सूक्ष्मजीवशास्त्र, मनोविकृतीशास्त्र तज्ज्ञ या वैद्यकीय उपचारासाठी रुग्णांची संख्या नगण्य आहे. सध्या कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या अधिका-यांच्या संख्येपेक्षाही यांसारख्या रुग्णांची संख्या कमी आहे. असे असतानाही आता नव्याने पदे भरण्याचा घाट घातला जात आहे, ही बाबच शंकास्पद आहे, त्यामुळी ही भरती प्रक्रिया तात्काळ रोखण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.