Pune : शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, महागाई, महापूर याकडे दुर्लक्ष करून केवळ 370 वर भाजपचा जोर : डॉ. विश्वजित कदम

एमपीसी न्यूज – राज्यात शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, महागाई, सांगली – कोल्हापूरचा महापूर याकडे भाजपने दुर्लक्ष करून विधानसभा निवडणुकीत केवळ 370 कलमवर जोर दिल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी केली. काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विजय खळदकर उपस्थित होते.

370 कलम लागू करायला हवे होते. पण, त्यासाठी काश्मीरमधील जनतेला विश्वासात घेणे गरजेचे होते. हुकूमशाही पद्धतीने हे कलम रद्द करण्यात आले? या कलमाचा महाराष्ट्र्राचा निवडणुकीशी काय संबंध? राज्यातील स्थानिक प्रश्न वेगळे आहेत. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात जनतेच्या मनात आक्रोश आहे. तो मतदानातून व्यक्त होईल. खासदार राहुल गांधी यांची महाराष्ट्रात सभा होणार आहे. तसेच ज्योतिरादित्य सिंधिया यांचाही सभांचे नियोजन सुरू आहे. राहुल यांनी सांगलीत वेळ दिला तर तिथेही सभा होणार असल्याचे विश्वजित कदम यांनी सांगितले.

राज्यात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सांगली – कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना कोणतीही मदत मिळाली नाही. अतिवृष्टीमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. मात्र, केंद्राचे कोणतेही पॅकेज मिळाले नाही. व्यापारी, शेतकरी, नागरिकांचे मोठे नुकसान झाले. या दरम्यान भाजपची मंडळी जल्लोष यात्रा काढण्यात व्यस्त असल्याची आठवणही त्यांनी करून दिली. प्रशासन पूर्ण अपयशी ठरले असून, आचारसंहितेचे कारण देऊन लोकांना काहीही मदत करण्यात आली नाही.

राज्यातील लाखो शेतकऱ्यांची शिवाजी महाराज यांचा कर्जमाफी योजनेखाली पोकळ घोषणा करण्यात आली. कागदोपत्री अनेक अटी या योजनेत टाकण्यात आल्या. शेतकरी योजनेसाठी पात्र ठरू नये, असेच नियम करण्यात आले. दरम्यान, कोथरूड मतदारसंघांत काँग्रेसकडे विजय खळदकर यांच्यासारखा प्रामाणिक कार्यकर्ता होता. त्यांना 2017 चा पुणे महापालिका निवडणुकीत कर्वेनगरमधून चांगली मते मिळाली होती. तरीही त्यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी का मिळाली नाही? मनसेला पाठिंबा का दिला ? अशी विचारणा केली असता, हा वरिष्ठांचा निर्णय असल्याचे विश्वजित कदम म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.