Murlidhar Mohol : पुण्याच्या माजी महापौरांवर भाजपने सोपवली मोठी जबाबदारी

एमपीसी न्यूज – येत्या काही दिवसात पुणे महापालिका आणि पिंपरी महापालिकेची निवडणूक पार पडणार आहे.या दोन्ही महापालिकेवर पुन्हा आपली सत्ता मिळवण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा या दोन्ही महापालिका ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली आहे. अशात आता भाजपने पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्यावर राज्याच्या सरचिटणीस पदाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

गुरुवारी भाजपकडून राज्याच्या सरचिटणीसपदी काही नियुक्ती केले आहेत. त्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची देखील घोषणा करण्यात आली आहे. मोहोळ यांच्यासोबतच ठाण्याच्या माधवी नाईक, रायगडचे विक्रांत पाटील, अकोल्याचे रणधीर सावरकर आणि संभाजीनगरचे संजय केणेकर यांची देखील राज्याच्या सरचिटणीस पदावर वर्णी लागली आहे.

मुरलीधर मोहोळ पुण्याचे महापौर असताना त्यांनी कोरोना काळात चांगले काम केले होते. त्यांच्या कामाने पुणेकरांवर चांगली छाप पडली होती. त्यामुळे आगामी खासदारकीसाठी त्यांचं नाव अग्रक्रमाने घेतले जातं. याशिवाय मुरलीधर मोहोळ हे देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातले नेते म्हणून ओळखले जातात. याशिवाय अनेक वर्ष नगरसेवक राहिल्याने, पुणे महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष राहिल्याने आणि पुण्याचे महापौर राहिल्याने शहराच्या प्रश्नाचे अभ्यासू नेते म्हणून देखील त्यांची ओळख आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.