Pimpri : आझमभाईंना न्याय देण्यासाठी भाजप नेते मुख्यमंत्र्यांना घालणार साकडे

एमपीसी न्यूज – दिवंगत पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेवर उर्वरित दीड वर्षासाठी पिंपरी-चिंचवडमधील ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांना संधी द्यावी, यासाठी शहरातील भाजपचे प्रमुख नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आझमभाईंना विधान परिषदेवर अथवा कोणत्या तरी शासकीय महामंडळाच्या अध्यक्षपदी संधी मिळेल, अशी त्यांच्या समर्थकांना आशा होती. मात्र वेळोवेळी आझमभाईंना डावलण्यात आल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. राज्य सरकारने 31 ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या 21 महामंडळांच्या यादीत आझमभाई पानसरे यांचे नाव दिसेल अशी अपेक्षा होती, मात्र ही अपेक्षा उपेक्षा बनून गेली.

आझमभाई पानसरे यांचे पिंपरी चिंचवड शहरात वर्चस्व आहे. त्यांनी शहराचे महापौर पद देखील भूषविले आहे. मावळ लोकसभा मतदार संघात येणा-या पिंपरी विधानसभा मतदार संघावर त्यांची पकड आहे. त्यांचे पाठिराखे मोठ्या संख्येने आहेत. पिंपरी मतदार संघ अस्तित्वात आल्यापासून पानसरे ज्यांच्यासोबत तोच आमदार होतो, असा इतिहास आहे. त्यामुळे मावळ लोकसभा मतदार संघ आणि पिंपरी-चिंचवड शहरातील तिन्ही विधानसभा मतदार संघांवर वर्चस्व निर्माण करायचे असेल तर आझमभाई पानसरे यांची नाराजी परवडणारी नाही.

माजी कृषिमंत्री आणि विधानपरिषदेचे सदस्य राहिलेले पांडुरंग फुंडकर यांचे 31 मे रोजी निधन झाले. त्यामुळे विधान परिषदेची त्यांची जागा रिक्त झाली. त्यांचा दीड वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे दीड वर्षांसाठी का होईना पानसरे यांना विधान परिषदेवर संधी देऊन त्यांचे समर्थक व अल्पसंख्यांक समाजाची मते पक्षाकडे वळू शकतील, असे बेरजेचे गणित शहरातील भाजप नेते मुख्यमंत्र्यांपुढे मांडणार असल्याची चर्चा आहे. पानसरे यांना विधान परिषदेवर संधी दिल्यास सर्वमान्य नेत्याला न्याय दिला जाईल, अशी भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे यांच्यासह पक्षाचे शहरातील प्रमुख नेते मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.