Pimpri: भाजप आमदार पडळकरांचे शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान; राष्ट्रवादीचे जोरदार प्रत्युत्तर

BJP MLA Padalkar's controversial statement about Sharad Pawar; NCP's strong response

बारामतीकरांनी पडळकरांसारखा व्हायरस बाजूला ठेवला, रुपाली चाकणकरांचा पलटवार

एमपीसी न्यूज – भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे असे वादग्रस्त विधान त्यांनी केले. त्याला राष्ट्रवादीने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.  विधानसभेला बारामतीत जप्त झालेले डिपॉझिट आणि त्यातून आलेले नैराश्य या भावनेपोटी पडळकर बोलत आहेत. त्यांना मानसोपचारतज्ज्ञाची गरज असून त्यांनी उपचार घ्यावेत. बारामतीकरांनी विधानसभेला पडळकरांसारखा व्हायरस बाजूला ठेवल्यालाचा पलटवार राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केला आहे.

पंढरपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना भाजप आमदार पडळकर म्हणाले की, महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणावर शरद पवारांना केवळ राजकारण करायचे आहे.

आजपर्यंत बहुजन समाजावर पवारांनी अत्याचार केले. हे नेतृत्व राज्याचे असू शकत नाही. त्यामुळे शरद पवारच महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे.

धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर मागील सरकारने एक हजार कोटींची तरतूद केली होती. मात्र, या सरकारने अर्थसंकल्पात कसलीही तरतूद धनगर समाजासाठी केली नाही.

त्यामुळे पवारांकडून धनगर समाजाच केवळ राजकारणासाठी उपयोग केला जातो. पवारांचे नेतृत्व केवळ राजकारण करण्यापुरते मर्यादित आहे, अशी टीका पडळकर यांनी केली होती.

त्याला राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. चाकणकर म्हणातात, मी बारामतीकरांचे आभार मानते. विधानसभा निवडणुकीत पडळकरांसारखा व्हायरस बाजूला ठेवला.

धनगर समाजासोबत बिरोबाची खोटी शपथ घेतली. त्या पडळकरांनी आज पवारसाहेबांवर टीक करुन आपली वैचारीक पातळी आणि उंची किती आहे दाखवून दिली.

ज्यांनी आपले अखंड आयुष्य बहूजन समाजाच्या उद्धारासाठी खर्च केले त्या पवारसाहेबांवर टीका करुन आम्हा सर्व बहूजनांच्या भावना दुखावल्या आहेत.

पडळकर यांच्या वयापेक्षा पवारसाहेबांची राजकीय कारकीर्द मोठी आहे. बारामतीत आपले जप्त झालेले डिपॉझिट आणि त्यातून आलेले नैराश्य या भावनेपोटी ते बोलत आहात.

त्यामुळे त्यांना उत्तम मानसोपचारतज्ज्ञाची गरज आहे. त्यांनी जरुर उपचार घ्यावेत. यापुढे पवारसाहेबांवर टीका करत असताना तुमचे सर्वोच्च नेते मोदी साहेब यांचा आदर्श घ्यावा.

कारण ते स्वत: बारामतीत येवून पवारसाहेबांची स्तुती करतात. त्यांच्या कार्याचे कौतुक करतात. त्यांचाही थोडा आदर्श घेता आला तर घ्या. भाजपची असभ्य संस्कृती आपण फार लवकर शिकलात हे दुर्दैव आहे, अशा शब्दांत चाकणकर यांनी पडळकर यांच्यावर टीकास्त्र सोडेल.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे म्हणाले, राजकारणात टीका करावी. परंतु, आपली पातळी सांभाळून टीका केली पाहिजे. पवारसाहेबांसारख्या व्यक्तिमत्वावर लायकी नसताना पडळकरांनी टीका केली आहे. हे भाजपच्या नेत्यांना तरी शोभते का, याचा देखील विचार करायला हवा.

वंचित विकास आघाडीला सोडचिट्टी देऊन आमदारकी मिळविण्यासाठी पडळकरांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आमदारकी मिळाल्यानंतर पवारसाहेबांवर टीका करत आहेत. टीका करत असताना पातळी सोडत आहेत.

त्याचा तीव्र निषेध करतो. पडळकर यांनी माफी मागावी,त्यासाठी उद्या सकाळी दहा वाजता लोकमान्य पुतळा मंडई येथे सुरक्षित अंतराचे पालन करत आंदोलन करणार आहोत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.