Pune News : पुण्यातील ‘त्या’ भाजप आमदाराचा पाय खोलात, पोलिसांकडून कारवाईच्या हालचाली

एमपीसी न्यूज : पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे आमदार सुनील कांबळे यांनी महापालिकेतील महिला अधिकाऱ्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा दावा करणारी ऑडिओ क्लिप काही दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. या कथित ऑडिओ क्लिपची पुणे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

काही दिवसांपूर्वीच बंडगार्डन पोलिसांनी या प्रकरणी पीडित महिला अधिकाऱ्याचा जबाब नोंदवला आहे. या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या इतरांचाही जबाब टप्प्याटप्प्याने नोंदवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

भाजप आमदार व नगरसेवक सुनील कांबळे हे महापालिकेतील रखडलेले बिल काढण्यावरून एका महिला अधिकाऱ्याला आणि इतर दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करत असल्याची ऑडिओ क्लिप काही दिवसांपूर्वी बाहेर आली होती.

ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर सुनील कांबळे यांच्या विरोधात राष्ट्रवादी आंदोलनही केले होते. त्यांच्याविरोधात टीका देखील करण्यात आली होती. या प्रकरणानंतर कांबळे यांनी खुलासा करताना तो आवाज आपला नसल्याचे सांगितले होते. तसेच पुणे पोलिसांनी याची चौकशी करावी असे आवाहन देखील त्यांनी केले होते.

त्यानुसार बंडगार्डन पोलिसांनी नुकताच पीडित महिला अधिकाऱ्याचा जबाब नोंदवला. टप्प्याटप्प्याने इतरही व्यक्तींचा जबाब नोंदविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.