Nigdi News: भाजपच्या आमदारांनी दुकान नव्हे तर ‘मॉल’च उभे केले; शरद पवार कडाडले

एमपीसी न्यूज – चिंचवड आणि भोसरीच्या भाजप आमदारांनी पिंपरी-चिंचवड शहर वाटून घेतले. ही तुझी आणि ही माझी बाजू असे वाटप केले. या आमदारांनी दुकान न मांडता मॉलच उभे केल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्यावर केला. दरम्यान, पक्षाच्या आत्ताच्या कार्यकारिणीत सुसूत्रता नाही. अध्यक्ष कायम गोंधळलेले असताना अशा तक्रारी माजी नगरसेवकांनी केल्या.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी निगडी, यमुनानगर येथील बॅक्वेट हॉल येथे माजी नगरसेवकांची स्वतंत्र बैठक घेतली. माजी नगरसेविका शमिम पठाण, पंडित गवळी, जगदीश शेट्टी, किरण मोटे, विनायक रणसुभे, तानाजी खाडे, संतोष कुदळे, रामभाऊ पिंपळे, राम धारिया आदी माजी नगरसेवक-नगरसेविका बैठकीला उपस्थित होत्या. सुरुवातीला माजी नगरसेवकांनी आपली मते मांडली.

पिंपरी-चिंचवड शहरात नात्या-गोत्यांचे राजकारण चालते. त्यातूनच मावळ लोकसभा मतदारसंघातून तीनही वेळा राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला. 2009 मध्ये आझम पानसरे, 2014 मध्ये राहुल नार्वेकर आणि 2019 मध्ये पार्थ पवार यांच्या पराभवाला आपलीच लोक कारणीभूत आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघातील 2009 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने आझमभाई पानसरे यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी जाती-पातीचे राजकारण आडवे आले. तर, 2014 च्या निवडणुकीत ॲड. राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली. त्यावेळी गाववाले-बाहेरचा हा मुद्दा आडवा आला. आता 2019 च्या निवडणुकीतही पार्थ पवार उमेदवार असतानाही नातीगोती, गावकी-भावकीच्या राजकरणातून आपल्याच लोकांनी मनापासून काम केले नाही.

आपल्याच लोकांमुळे पार्थचा पराभव झाल्याच्या तक्रारी माजी नगरसेवकांनी केल्या. शहरातील नातीगोती अन् जातीपातीचे राजकारण पक्षाला घातक ठरत आहे. त्यामुळे पक्ष वाढत नाही. पक्षाचे नुकसान होते. अशा तक्रारी माजी नगसेवकांनी शरद पवार यांच्यासमोर सांगितल्या. तसेच आगामी महापालिका निवडणुकीत माजी नगरसेवकांना 30 टक्के जागा राखीव ठेवण्याची मागणीही त्यांनी केली.

पक्षाच्या कार्यकारिणीत सुसूत्रता नाही, अध्यक्ष कायम गोंधळलेले!

पक्षाच्या आत्ताच्या शहर कार्यकारिणीत सुसूत्रता नाही. अध्यक्ष कायम गोंधळलेले असतात. नियोजन नसते. कोणत्याही कार्यक्रमात ताळमेळ नसतो अशा तक्रारीही माजी नगरसेवकांनी केल्या. महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या चुकीच्या कारभाराविरोधात आवाज उठविण्यात कार्यकारणी कमी पडतेय अशीही तक्रार या माजी नगरसेवकांनी केली.

माजी नगरसेवकांच्या भावना जाणून घेतल्यानंतर शरद पवार महणाले, ”सर्वांनी एकत्र रहा. भविष्यात सगळ्यांना योग्य त्या ठिकाणी संधी दिली जाईल. आपण शहरात एमआयडीसी आणली. शहराचा चेहरा-मोहरा बदलला. भाजपच्या दोन आमदारांनी शहर वाटून घेतले. दुकान मांडले नाही तर मॉल उभे केलेत. ही तुझी आणि ही माझी माझू बाजू असे वाटप केले. यामुळे शहरात विकासाचा धोरणात्मक कार्यक्रम नाही. आपल्या काळात शहराला विकासाचा चेहरा दिला. तसे काम आत्ता कुठेही दिसत नाही”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.