Chinchwad : भाजपने शहरातील अनधिकृत बांधकामधारकांचा 61 कोटी शास्तीकर केला माफ – हर्षल ढोरे

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने एक हजार चौरस फुटांपर्यंतच्या अनधिकृत बांधकामांचा शास्तीकर पूर्णपणे माफ करण्याचा कायदा केला. या निर्णयामुळे 78  हजार 104 अनधिकृत बांधकामधारकांचे 61 कोटी 2 लाख 92  हजार 525  रुपये शास्तीकर माफ झाल्याचा दावा भाजप नगरसेवक हर्षल ढोरे यांनी केला आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ सांगवीमध्ये आयोजित कोपरा सभेत ते बोलत होते. यावेळी विजय जगताप, नगरसेविका माई ढोरे, शारदा सोनवणे, नगरसेवक संतोष कांबळे भाजप, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी (आठवले गट), शिवसंग्राम आणि रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ढोरे म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेत असताना अनधिकृत बांधकामांना शास्तीकर लागू करण्याचा अन्यायकारक निर्णय लागू केला होता. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामधारकांचे कंबरडे मोडले होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने एक हजार चौरस फुटांपर्यंतच्या अनधिकृत बांधकामांचा शास्तीकर पूर्णपणे माफ करण्याचा कायदा केला.

नुसता कायदाच केला नाही तर हा शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. या निर्णयामुळे 78  हजार 104 अनधिकृत बांधकामधारकांचे 61 कोटी 2 लाख 92  हजार 525  रुपये शास्तीकर माफ झाल्याचा दावा ढोरे यांनी केला आहे. विरोधकांनी शास्तीकर माफीच्या निर्णयाबाबत कितीही संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला. तरी, भाजपचा विजय नागरिकांनीच निश्चित केलेला आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.