Pimpri News : पालिकेची फसवणूक करणाऱ्या ठेकेदाराला भाजपकडून 20 कोटींच्या कामाची खिरापत – योगेश बहल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने टक्केवारीसाठी पालिकेची लूट चालविल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. ज्या ठेकेदाराने वैद्यकीय विभागाच्या कामासाठी अनुभवाची बोगस कागदपत्रे सादर केली त्याच ठेकेदाराला बिनबोभाटपणे 20 कोटी 71 लाख रुपयांचे आणखी एक काम देण्यात आले आहे. सत्ताधारी भाजपा नगरसेवकांच्या हितासाठी सुरू असलेला हा प्रकार सत्ताधारी भाजपाच्या आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने सत्तेचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप, माजी महापौर, ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी केला आहे. स्थायी समितीने या कामाला मंजुरी दिली असली. तरी, प्रशासनाने श्रीकृपाची चौकशी पूर्ण होईपर्यंत या प्रस्तावावर कोणतीही कार्यवाही करू नये अशी मागणीही त्यांनी केली.

याबाबत योगेश बहल यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने मेडिकल आणि पॅरामेडिकल कर्मचारी पुरविण्याची निविदा प्रसिद्ध केली होती. या निविदेमध्ये सहभागी झालेल्या श्रीकृपा सर्व्हिसेस या ठेकेदाराने अनुभवाची बोगस कागदपत्रे दाखल केल्याचे मी पुराव्यानिशी जनतेसमोर उघडकीस आणले होते. त्याबाबत पत्रकार परिषद घेऊन महापालिका आयुक्तांनाही याबाबत निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यावर महिनाभरापासून महापालिका आयुक्तांनी कोणतीच कार्यवाही केलेली नाही. चौकशीच्या नावाखाली या ठेकेदाराला सत्ताधारी भाजपा नेत्यांच्या दबावाखाली पाठीशी घालण्याचा प्रकार सुरू आहे.

एका बाजूला हा ठेकेदार महापालिकेची फसवणूक करत असताना त्याच ठेकेदाराला महापालिकेच्या आरोग्य विभागाचे तब्बल 20 कोटी 71 लाख रुपयांचे काम देण्यात आले आहे. बोगस कागदपत्रे देणाऱ्या ठेकेदारावर फौजदारी कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकण्याची गरज असताना याच ठेकेदाराला नव्याने कोट्यवधी रुपयांचा ठेका दिला जातो यातून सत्ताधारी भाजपाला सत्तेचा गैरवापर करून केवळ आर्थिक हित साध्य करावयाचे आहे हेच सिद्ध होते. स्थायी समितीने आजच झालेल्या बैठकीमध्ये या कामाला मंजुरी देऊन भ्रष्टाचारी कारभारावर शिक्कामोर्तबच केले आहे.

स्थायी समितीने या कामाला मंजुरी दिली असली तरी प्रशासनाने श्रीकृपाची चौकशी पूर्ण होईपर्यंत या प्रस्तावावर कोणतीही कार्यवाही करू नये. संबंधित ठेकेदाराला कामाचे आदेश देऊ नयेत. यानंतरही प्रशासनाने सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली भ्रष्टाचार करण्याच्या हेतूने प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून ठेकेदाराला कामाचे आदेश दिल्यास संबंधित अधिकारी, ठेकेदार व महापालिका प्रशासनावर न्यायालयीन कार्यवाही केली जाईल, असा इशाराही बहल यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.