Talegaon Dabhade News : नगरपरिषदेतील गेल्या साडेचार वर्षांचा लेखाजोखा भाजपकडून सादर

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपालिकेत मागील साडे चार वर्षांमध्ये भाजपने केलेल्या विविध कामांचा लेखाजोखा भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी पत्रकार परिषदेत सादर केला. राज्यातील तत्कालीन भाजप सरकार आणि मावळचे तत्कालीन आमदार बाळा भेगडे यांच्या माध्यमातून 2050 सालचे तळेगाव समोर ठेवून विविध विकास कामांचे नियोजन करण्यात आले आहे.

भाजपने तळेगाव शहरात 250 कोटींची विकासकामे मागील साडेचार वर्षात राज्य शासनाकडून मंजूर करून आणली असल्याचे सांगत भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाना साधला. गेल्या काही दिवसात तळेगाव दाभाडे शहराला व भारतीय जनता पक्षाला बदनाम करण्याच्या हेतूने काही मंडळी येणाऱ्या तळेगाव नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून खोटेनाटे आरोप करीत  असल्याचे गणेश भेगडे म्हणाले.

तळेगाव शहर भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भेगडे बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष रवींद्र माने, उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे, सभागृहनेते अरुण भेगडे पाटील, माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे, राजेंद्र जांभूळकर, चंद्रकांत शेटे, संतोष दाभाडे पाटील, अमोल शेटे, संतोष शिंदे यांसह नगरसेवक, नगरसेविका व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

मागील आठवडय़ात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली होती. त्यामध्ये ‘भाजपाकडे व्हिजन नाही, अशा व्हिजन नसणाऱ्या पक्षाकडे सता देऊ नये’ असा सनसनाटी आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला होता. त्या आरोपाचे खंडन करण्यासाठी शनिवारी (दि. 11) भाजपाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली.

जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे म्हणाले, “सन 1972 च्या दुष्काळात पाण्याचा प्रश्न गंभीर होता, त्यावेळी भाजपचे तत्कालीन नगराध्यक्ष स्व. नथुभाऊ भेगडे पाटील यांच्या नेतृत्वात इंद्रायणी पाणी योजना पूर्ण करून पाणी प्रश्न सोडवला. तसेच पवना पाणी पुरवठा योजना पूर्ण करून वाढत्या शहरीकरणाचा पाणी प्रश्न निकाली काढला. तसेच सन 2006 मध्ये शासन दरबारी पाठपुरावा करून इंद्रायणी पाणीपुरवठा योजना पूर्ण करून तळेगाव स्टेशन विभागाचा पाणी प्रश्न मार्गी लावला.

नगरपरिषदेतील 40 कोटीच्या ठेवीबाबत राष्ट्रवादीकडून आरोप झाला होता त्यावर गणेश भेगडे यांनी खुलासा करत नवीन कचरा डेपोसाठी 7 एकर जागा घेण्यासाठी 6 कोटी रूपये खर्च केले. हिंदमाता भुयारी मार्गासाठी 8 कोटी रूपये, शहरातील सर्व वाॅर्डात एलईडी लाईट बसविण्यासाठी 13 कोटी, शासकीय देणी देण्यासाठी 5 कोटी,पवना पाणी योजनेसाठी एक्सप्रेस फिडरवर 2 कोटी, जैवविवधता उद्यानासाठी लोक वर्गणी 80 लाख रुपये, संत ज्ञानेश्वर शाळा  वाढीव बांधकामासाठी 50 लाख रूपये खर्च केल्याची आकडेवारी देखील भेगडे यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

शाॅपींग काॅम्प्लेक्सबाबत गाळे काही ठराविक लोकांनीच घेतल्याचा आरोपही भाजपवर झाला होता. त्याला उत्तर देताना जिल्हाध्यक्ष भेगडे म्हणाले, “ई लिलाव पद्धतीने एकूण 6 वेळा निविदा मागविण्यात आल्या होत्या, आणि त्या सर्वांसाठी खुल्या होत्या. शासनाने नेमून दिलेल्या त्रिसदस्यीय समितीद्वारे शासन धोरणानुसार लिलाव करण्यात आले असून नगरपरिषदेने गाळे वाटप केलेत. आजपर्यंत फक्त 43 गाळे गेले आहेत. बाकी गाळे दोन्ही काॅम्प्लेक्समध्ये शिल्लक असल्याचे भेगडे यांनी सांगितले. या लिलाव प्रक्रियेत संपूर्णपणे पारदर्शकता असून त्यांनी केलेले आरोप चुकीचे व निराधार असल्याचे भेगडे यांनी सांगितले.

त्याचबरोबर जिओ केबलमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे म्हटले होते. उलट आम्ही त्यांच्याकडून 3 कोटी रूपये भरून घेऊन नगरपरिषदेचा फायदाच केला आहे, असे भेगडे म्हणाले.

भाजपाकडे व्हिजन नाही म्हणता, मग भाजपाने 2050 सालाचे तळेगाव डोळ्यासमोर ठेवून अनेक विकास कामांचे नियोजन कसे केले? असा प्रतिसवाल देखील गणेश भेगडे यांनी उपस्थित केला.

या अगोदरच्या काळात भारतीय जनता पक्ष काही अपवाद वगळता नगर परिषदेवर सत्तारुढ पक्ष म्हणून अनेक वर्ष काम करत आहे. या काळात शहराच्या विकासाचे आदर्श व्हिजन डोळ्यासमोर ठेऊन विविध योजना तळेगावासाठी राबविल्या आहेत.

शहरातील पाणी योजना, भुयारी गटर योजना, तळेगावातील गोर गरीब नागरिकांसाठी हक्काची घरे, पंतप्रधान आवास योजनेतील घरे, हिंदमाता भुयारी मार्ग, व्यापारी संकुले, जैव विविधता उद्यान, शहरात सर्वत्र एलएडी दिवे लावणे आदि योजनासाठी शासनाचा निधी पक्षाने पाठपुरावा करून उपलब्ध करून मार्गी लावल्याचे भेगडे यांनी सांगितले.

तसेच कचरा डेपो येथे कचरा विघटन यंत्रणा बसविली. याशिवाय शहरातून कचरा वाहतुकीची स्वतंत्र यंत्रणा उभी केली. शहरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड तसेच शहरात विविध विकास योजना राबविल्या.

आमदार सुनील शेळके व त्यांच्या पक्षाच्या सहका-यांनी भारतीय जनता पक्षावर बेछूट व बिनबुडाचे आरोप करून पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. हे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा देखील पत्रकार परिषदेत भेगडे यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.