Pune News : भामा आसखेडच्या पाणीवाटपावरून भाजपामध्ये फूट !

एमपीसी न्यूज : भामा-आसखेड योजनेचे काम पूर्ण झाले आहे. पुढील काही दिवसांत हे पाणी धानोरी, कळस, टिंगरेनगर, येरवडा, विमाननगर, वडगावशेरी, खराडी, चंदननगर, नगर रस्ता भागातील सुमारे 8 लाख नागरिकांना मिळणार आहे. मात्र, या पाण्याचा वाटा इतर भागांसाठी मागण्यात येत आहे. हे पाणी आल्यानंतर नगर रस्त्याला पालिकेकडून पूर्वी देण्यात येणारे पाणी बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या प्रकारास नगरसेवक अनिल टिंगरे यांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे पाणी येण्यापूर्वीच भाजपमध्ये खंडाजंगी उडाली असून उभी फूट पडल्याचे चित्र आहे.

याबाबत अनिल टिंगरे यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहिले आहे. यात टिंगरे म्हणाले, ‘गेली अनेक वर्षे पाण्यासाठी वणवण सुरू आहे. या भागाचे क्षेत्रफळ, लोकसंख्येची घनता पाहता, सध्याचे पाणी अपुरे आहे. त्यामुळे भामा-आसखेड प्रकल्पाचे काम मार्गी लागावे, यासाठी नागरिकांनी वेळोवेळी आंदोलने तसेच इतर मार्गातून पाठपुरावा केला.

आता हे पाणी मिळणार असतानाच, काही लोकप्रतिनिधी भामा-आसखेडचे पाणी इतर भागांना देण्यासाठी मागणी करत आहेत. याला नागरिकांचा तीव्र विरोध आहे. आधी आमची पाण्याची मागणी पूर्ण करावी, त्यानंतर इतरांना पाणी देण्याचा विचार करावा.’

आमदारांच्या मागणीलाच आक्षेप

भामा- आसखेड योजनेचे पाणी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डास द्यावे, अशी मागणी भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली आहे. तर नगररस्ता परिसराला सध्या दिले जाणारे पाणी भामा-आसखेड योजनेनंतर हडपसरला देण्याची मागणी नगरसेविका कालिंदा पुंडे यांनी केली आहे. त्यामुळे टिंगरे यांनी थेट स्वपक्षाच्या आमदारांच्या मागणीवर आक्षेप घेतला आहे. या भागातील पाणीप्रश्‍नासाठी महापालिकेत भाजपचीच सत्ता असतानाही प्रसंगी मुख्यसभेत आपण आंदोलन केले आहे. त्यामुळे नागरिकांच्या प्रश्‍न आपल्याला महत्त्वाचा आहे, असे अनिल टिंगरे यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.