Pune News : भाजप प्रवक्ते विनायक अंबेकर मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीच्या चार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पुण्यातील भाजपचे ज्येष्ठ प्रवक्ते विनायक अंबेकर यांना दोन दिवसापूर्वी मारहाण करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विषयी आक्षेपार्ह भाषेत कविता लिहिल्यामुळे त्यांच्या कार्यालयात घुसून राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली होती. याप्रकरणी आता चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडक पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता 1860 अन्वये कलम 504, 323 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विनायक अंबेकर हे भाजपचे ज्येष्ठ प्रवक्ते आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या सोशल मीडियावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विषयी एक कविता पोस्ट केली होती. दरम्यान कवितेतील काही ओळी वर आक्षेप घेत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचा विरोध केला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना दमदाटी करत मारहाण केली होती.

या सर्व घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर खडक पोलिसांनी याची नोंद घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

दरम्यान विनायक अंबेकर यांनी देखील या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील प्रवक्ते अंकुश काकडे यांनी आपल्याला मारहाण करायला लावली असल्याचा आरोप त्यांनी केलाय. माझ्या कवितेत काही चुकीच्या ओळी होत्या, त्याबद्दल मी माफी देखील मागितली होती. परंतु तरीही अंकुश काकडे यांनी काही कार्यकर्त्यांना पाठवून मला मारहाण करण्यास भाग पाडल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान या प्रकरणी आता गुन्हा दाखल झाला असून खडक पोलिस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.