Nigdi : भाजप पदाधिकाऱ्याची राष्ट्रवादीकडून सोशल मीडियावर बदनामी?; भाजप पदाधिकाऱ्याची पोलिसात तक्रार

एमपीसी न्यूज – मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांवर निगडी पोलिसांनी केलेल्या कारवाईचे फोटो व्हायरल झाले. त्या फोटोचा आधार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने शहर भाजपचे संघटन सरचिटणीस यांच्याबाबत सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर पोस्ट केला. राजकीय सूडबुद्धीने सुरू असलेल्या या बदनामीप्रकरणी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी भाजप पदाधिका-याने निगडी पोलिसांकडे केली आहे.

पिंपरी चिंचवड शहर भाजपचे संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी निगडी पोलिसांकडे तक्रार केली आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुहास उभे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी थोरात यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

अमोल थोरात यांनी निगडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे. त्या निवेदनात म्हटले आहे की, “लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. निगडी पोलिसांनी सुद्धा शनिवारी (दि. 18) सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांवर कारवाई केली. या कारवाईचे फोटो विविध माध्यमांतून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहेत. या फोटोंचा गैरफायदा घेऊन राजकीय सूडबुद्धीने माझी बदनामी करण्याचे कारस्थान रचले गेले आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन केलेल्या एका नागरिकाचा फोटो माझ्याविषयीच्या मानहानीकारक मजकूरासह फेसबुक, व्हॉट्स अॅप अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर व फॉरवर्ड करून व्हायरल केला जात आहे. मी भाजपाचा सक्रिय कार्यकर्ता असून, भाजपाच्या पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणीचा पदाधिकारी आहे. त्यामुळे माझे काही राजकीय विरोधक माझी बदनामी करीत आहेत. त्यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा वापर सुरू केला आहे.

सुहास उभे या व्यक्तीने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन करून मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या एका व्यक्तीचा त्यात फोटो आहे. तो फोटो थोरात यांचा असून, थोरात यांनी लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याचा त्या पोस्टमध्ये उल्लेख आहे. आपली बदनामी करण्यासाठी हा खटाटोप केला गेला आहे. त्यामुळे सुहास उभे या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी थोरात यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.