Pune : भाजपचा शहराध्यक्ष जाहीर, राष्ट्रवादीचा कधी होणार?

एमपीसी न्यूज – भाजपने आगामी महापालिका निवडणूक लक्षात घेऊन तातडीने माजी आमदार जगदीश मुळीक यांची पुणे शहर अध्यक्ष म्हणून निवड जाहीर केली आहे. या निवडीपूर्वी राष्ट्रवादीचा अध्यक्ष जाहीर होणार असल्याचे सांगण्यात येत होते. पण, अद्यापही या पक्षाचा अध्यक्ष जाहीर झाला नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

राष्ट्रवादीचे विद्यमान शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील आमदार झाले आहेत. त्यांचा शहराध्यक्ष पदाचा भार कमी करणार असल्याचे खुद्द अजित पवार यांनी सांगितले होते. भाजप खालोखाल राष्ट्रवादीचे महापालिकेत 41 नगरसेवक आहेत. शहराध्यक्ष पदासाठी माजी महापौर प्रशांत जगताप, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक, माजी उपमहापौर दीपक मानकर, नगरसेवक बाबुराव चांदेरे, सचिन दोडके, विशाल तांबे यांच्या नावाची चर्चा आहे. तर, शहराध्यक्ष पाठोपाठ महापालिकेतील विरोधी पक्षनेतेही बदलण्यात येणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

या पदासाठी महिलेला संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र, ज्येष्ठ नगरसेवक दीपक मानकर यांच्या नावावर चर्चा सुरू असल्याचे समजते. वरील दोन्ही पदासाठी मानकर यांनी अर्ज केलेला नाही. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी मानकर यांना विरोधी पक्षनेता करण्याची मागणी जोर धरत आहे. नागरसेविका नंदा लोणकर, माजी महापौर वैशाली बनकर, अश्विनी कदम, दीपाली धुमाळ, नगरसेवक सचिन दोडके, महेंद्र पठारे, योगेश ससाणे या सात जणांनी पक्षाकडे अर्ज केले आहेत.

नेमकी कोणाला संधी मिळणार, याकडे लक्ष लागले आहे. तर, विरोधी पक्षनेते पदावर काम करण्यासाठी दिलीप बराटे यांना केवळ 1 वर्षाचा कालावधी मिळाला. त्यामध्ये 3 महिने विधानसभा आणि 3 महिने लोकसभा आचारसंहितेचा कालावधी गेला. त्यामुळे त्यांना आणखी कालावधी वाढवून देण्याची मागणी त्यांच्या समर्थकांची आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.