BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : राष्ट्रवादीच्या प्रश्नांच्या सरबत्तीमुळे भाजपवर ‘गोशाळेच्या’ प्रस्तावाच्या तहकुबीची नामुष्की

पक्षादेश होता विषय मंजूर करण्याचा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेची चिखली येथील कोंडवाड्याची जागा किती एकर आहे? जागा किती वर्षांकरिता गोशाळेसाठी खासगी संस्थेला दिली जाणार आहे? महापालिका काय सुविधा देणार आहे? अशा विविध प्रश्नांची सरबत्ती राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेविका, माजी महापौर मंगला कदम यांनी केली. प्रशासनाला त्याची सविस्तर उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे विषय मंजूर करण्याचा ‘व्हीप’ (पक्षादेश) असताना सत्ताधारी भाजपवर एक पाऊल मागे येत विषय तहकूब करण्याची नामुष्की ओढावली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची सप्टेंबर महिन्याची सर्वसाधारण सभा आज (शुक्रवारी) पार पडली. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. चिखली येथील कोंडवाड्यासाठी आरक्षित असलेली गट क्रमांक 1,655/2, आरक्षण क्रमांक 1/79 ही जागा चंद्रभागा गोशाळा संवर्धन संस्था ट्रस्ट या खासगी संस्थेला गोशाळा चालविण्यासाठी देण्याचा शहर सुधारणा समितीमार्फत आलेला सदस्य पारित प्रस्ताव विषयपत्रिकेवर 5 व्या क्रमांकावर मान्यतेसाठी ठेवला होता. भाजपच्या पार्टीमध्ये हा विषय मंजूर करण्याचे ठरले होते. सभागृह नेते एकनाथ पवार यांनी नगरसेवकांना तसा व्हीप देखील बजाविला होता.

राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेविका मंगला कदम म्हणाल्या, चिखली येथील कोंडवाड्याची जागा किती एकर आहे? जागा किती वर्षांकरिता गोशाळेसाठी खासगी संस्थेला दिली जाणार आहे? किती वर्षांचा करार केला जाणार? महापालिका काही सुविधा देणार आहे? याबाबतची प्रस्तावात कोणतीची माहिती नाही. त्याची सविस्तर माहिती सभागृहाला होणे आवश्यक आहे. त्याचा खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली.

त्यावर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांनी खुलासा केला. 2 हेक्टर कोंडवड्यासाठी आरक्षित जागा आहे. गोशाळेला जागा देण्याचा सदस्य पारित प्रस्ताव आहे. त्यामुळे सविस्तर माहिती नाही.

त्याला पुन्हा कदम यांनी आक्षेप घेतला. त्या म्हणाल्या, 2 हेक्टर म्हणजे महापालिका 5 एकर जागा गोशाळेला देणार आहे. महापालिकेने आजपर्यंत कोंडवाडा का बांधला नाही? आयुक्त सदस्य पारित प्रस्ताव मंजूर करणार आहेत का? पशुवैद्यकीय अधिका-यांचे उत्तर समाधानकारक नाही. खुलासा व्यवस्थित होत नाही. तोपर्यंत हा विषय तहकूब ठेवण्याची मागणी त्यांनी केली.

सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले, गोमातेचे रक्षण केले पाहिजे. विषय चांगला आहे. परंतु, जागा किती दिली जाणार आहे हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. त्यामुळे हा विषय तहकूब ठेवण्यात यावा. त्यानंतर महापौर राहुल जाधव यांनी हा विषय तहकूब केला आहे. दरम्यान, भाजपचे राजेंद्र लांडगे, संतोष लोंढे यांनी विषय मंजूर करण्याची मागणी केली होती.

HB_POST_END_FTR-A2

.