Pimpri : राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडच्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने माघार न घेता निवडणूक लढविण्याचा निर्णय कायम ठेवला. त्यांच्या या खेळीमुळे आलबेल वाटणा-या भाजपमधील ‘खदखद’ मात्र  चव्हाट्यावर आली. महापौरपदासाठी डावलल्यामुळे नाराज झालेले पिंपळेसौदागरचे नगरसेवक शत्रुघ्न काटे हे महासभेला उपस्थित राहिले नाहीत. तर, भोसरीचे नगरसेवक रवी लांडगे यांनी देखील नाराजीतूनच महासभेला दांडी मारल्याची, जोरदार चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहे. याशिवाय भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप हे देखील उमेदवारी अर्ज भरताना आणि आजही महापौर निवड झाल्यावर पालिकेत फिरकले नाहीत. त्यामुळे एकहाती सत्ता असलेल्या भाजपमध्ये सर्व आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर च-होलीचे प्रतिनिधित्व करणारे नितीन काळजे यांना पहिल्यावेळी महापौरपदाची संधी दिली. तर, उपमहापौरपदी शैलजा मोरे यांची निवड केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने माघार घेतल्याने मार्च 2017 मध्ये झालेली महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली होती. राज्यभरात भाजपची सत्ता असलेल्या एकाही महापालिकेतील पदाधिकारी बदलले नाहीत. मात्र, पिंपरी पालिकेतील महापौर, उपमहापौरांना सव्वा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे राजीनामा देण्यास भाग पाडले.

पालिकेत भाजपचे 77 नगरसेवक असून पाच अपक्ष नगरसेवकांचा त्यांना पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांच्या नगरसेवकांची संख्या 82 होते. त्यामुळे भाजपचा उमेदवार निवडून येणार हे निश्चित होते. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढविण्याच्या भूमिकेवर शेवटपर्यंत ठाम राहिला. सत्ताधा-यांनी विनवणी केल्यानंतर देखील राष्ट्रवादीने माघार घेतली नाही. त्यामुळे निवडणूक घ्यावी लागली. या निवडणुकीत भाजपचे महापौरपदाचे उमेदवार राहुल जाधव यांना 80 मते पडली. जाधव यांना मनसेने देखील मतदान केले. तर, राष्ट्रवादीचे विनोद नढे यांना 33 मतांवर समाधान मानावे लागले.

राष्ट्रवादीच्या या खेळीमुळे भाजपमधील गटबाजी बाहेर आली. पक्षादेश (व्हीप) बजावून देखील शत्रुघ्न काटे, रवी लांडगे यांनी महासभेला दांडी मारली. आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेले काटे हे महापौरपदासाठी तीव्र इच्छूक होते. त्यांनी शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली होती. परंतु, त्यांना डावलण्यात आले. या नाराजीतूनच ते महासभेला अनुउपस्थित राहिले. तर, भोसरीचे नगरसेवक रवी लांडगे यांनी देखील महासभेला दांडी मारली. पक्षावर नाराज असल्यामुळेच लांडगे यांनी सभेला दांडी मारली असल्याची, जोरदार चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहे. यामुळे भाजमध्ये अंतर्गत खदखद सुरु असल्याचे, समोर आले.   तर, पिंपळेनिलखचे भाजपचे नगरसेवक तुषार कामठे कौटुंबिक कारणामुळे अनुउपस्थित होते.

महापौरनिवडीकडे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी फिरविली पाठ!

भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापौरनिवडीकडे पूर्णपणे पाठ फिरविली. महापौर आणि उपमहापौरांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यावेळी देखील जगताप उपस्थित नव्हते. तसेच आज महापौर, उपमहापौरांची निवड झाल्यानंतर देखील ते पालिकेत फिरकले नाहीत. आपल्या समर्थकाला महापौरपदी बसवू न शकल्यामुळेच जगताप यांनी महापौरनिवडीकडे पाठ फिरविली असल्याची, जोरदार चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.