Pimpri : प्रदेशाध्यक्षांच्याच आदेशाला भाजपचा ‘कोलदांडा!, उपसूचना स्वीकारल्याच

अवघ्या तीन मिनिटात केले 18 विषय मंजूर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने चक्क प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशालाच कोलदांडा दाखवला आहे. ‘महासभेत एकही उपसूचना द्यायची आणि घ्यायची नाही’ असा पाटील यांचा आदेश असताना सत्ताधा-यांनी आज (बुधवारी) झालेल्या महासभेत गोंधळाचा फायदा घेत तब्बल पाच विषयांच्या उपसूचना घुसडल्या. त्यातील काही उपसूचना आर्थिक असून त्याचे वाचन देखील केले नाही. तसेच गोंधळात सभेचे कामकाज उरकत अवघ्या तीन मिनिटात 18 विषय मंजूर केल्याने भाजपवर टीका होत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी महिन्याची तहकूब सभा आज (बुधवारी) पार पडली. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या.  सर्वसाधारण सभेत दिल्या जाणा-या उपसूचना काहीही असतात. बाकीच्या सदस्यांना उपसूचना माहित होत नसल्याने त्यांच्या तक्रारी असतात. त्यामुळे महासभेत एकही उपसूचना द्यायची आणि घ्यायची नाही, असा आदेश भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पदाधिका-यांना दिला होता. महापालिकेत सत्तेत आल्यापासून उपसूचनांचा पाऊस पाडणा-या सत्ताधा-यांनी प्रदेशाध्यक्षांच्या आदेश डावलून आजच्या सभेत उपसूचना स्वीकारल्याच. त्यामध्ये आर्थिक उपसूचना देखील आहेत.

महासभेत बोलून दिले नसल्याने गोंधळ झाला. या गोंधळातच भाजपने सभेचे कामकाज रेटून नेले. अवघ्या तीन मिनिटांत विषयपत्रिकेवरील 18 विषयांना मान्यता दिली. कोणताही विषय वाचला नाही, ना कोणी अनुमोदन दिले. तशीच विषयांना मान्यता दिली. तर, गोंधळाचा फायदा घेत उपसूचना देखील घुसडल्या. तब्बल पाच विषयांना उपसूचना दिल्या आहेत. या उपसुचनांचे देखील कोणी वाचन केले नाही. यामध्ये काही उपसूचना आर्थिक देखील आहेत. सत्ताधा-यांनी प्रदेशाध्यक्षांचाच आदेश डावल्याने आता प्रदेशाध्यक्ष पाटील कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.