Lonavala News : भाजपाच्या मावळ बंदला लोणावळ्यात संमिश्र प्रतिसाद

बाजारपेठ कडकडीत बंद, नाका सुरू

एमपीसी न्यूज : पुणे जिल्हा बॅकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ मावळ तालुका भाजपाच्या वतीने आज पुकारण्यात आलेल्या मावळ तालुका बंदला आज लोणावळ्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.

लोणावळा शहराची मुख्य बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती तर गवळीवाडा नाका व आजुबाजुच्या परिसरातील दुकाने खुली असल्याचे चित्र पहायला मिळाले. लोणावळा बाजारपेठेतील सर्व व्यावहार मात्र आज कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. मेडिकल, बेकरी व भाजीपाला यांची दुकाने सुरू होती.

नेवाळे यांना झालेली अटक ही राजकीय दबावातून झाली असून मावळात सध्या सुडाचे राजकारण सुरू असल्याचा घणाघात भाजपाने केला आहे. सत्ताधारी पक्ष प्रशासनावर दबाव आणत भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायला भाग पाडत असल्याचा भाजपाने आरोप केला आहे.

यासर्व प्रकाराचा निषेध नोंदविण्यासाठी आजचा बंद पुकारण्यात आला आहे. यामध्ये भाजपाने बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन मावळवासीयांना केले तर महाविकास आघाडीने बंदमध्ये सहभागी न होता सर्व व्यावहार सुरू ठेवा असे आवाहन नागरिकांना केल्याने व्यापारी वर्गासह नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. लोणावळ्यात मात्र व्यापारी वर्गाने बंदात सहभाग नोंदविला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.