Pimpri News : स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपचे नितीन लांडगे; राष्ट्रवादीच्या प्रवीण भालेकर यांचा पराभव

भाजपच्या नाराज रवी लांडगे यांनी निवडणुकीला येणे टाळले

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपच्या अॅड. नितीन लांडगे यांची आज (शुक्रवारी) निवड झाली. त्यांनी राष्ट्रवादीचे प्रवीण भालेकर यांचा 5 मतांनी पराभव केला. लांडगे यांना 10 तर भालेकर यांना 5 मते मिळाली. लांडगे हे स्थायी समितीचे 37 वे अध्यक्ष आहेत. दरम्यान, अध्यक्षपदासाठी डावलल्यानंतर नाराज झालेल्या आणि स्थायी समिती सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिलेल्या रवी लांडगे यांनी निवडणुकीला येणे टाळले. भाजपने अद्याप रवी यांचा राजीनामा स्वीकारला नाही.

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी मंगळवारी (दि.2) अर्ज दाखल केले होते. सत्ताधारी भाजपकडून अॅड. नितीन लांडगे आणि राष्ट्रवादीचे प्रवीण भालेकर यांनी अर्ज दाखल केले होते. स्थायीत भाजपचे 10, अपक्ष 1 असे 11 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 4, शिवसेना 1 असे 16 सदस्य  आहेत. भाजपचे रवी लांडगे यांनी राजीनामा दिला आहे. परंतू, पक्षाने मंजूर केला नसतानाही त्यांनी निवडणुकीला येणे टाळत पुन्हा आपली नाराजी पक्षाला दाखवून दिली.

महापालिकेतील स्थायी समिती सभागृहात आज सकाळी बारा वाजता निवडणूक प्रक्रिया पार पडली. अर्ज माघार घेण्यासाठी 15 मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता. सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला माघार घेण्याची विनंती केली. परंतु, राष्ट्रवादीने माघार घेण्यास नकार दिला. राष्ट्रवादीच्या प्रवीण भालेकर यांनी माघार घेतली नाही.  त्यामुळे निवडणूक प्रक्रिया झाली.

भाजपच्या लांडगे यांना 10 मते मिळाली. तर, राष्ट्रवादीचे भालेकर यांना पाच मते मिळाली. शिवसेनेच्या मीनल यादव यांनी राष्ट्रवादीला मतदान केले. भाजपच्या लांडगे यांचा 5 मतांनी विजय झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी जाहीर केले. दरम्यान, रवी लांडगे गैरहजर राहिल्याने नितीन यांचे 1 मत कमी झाले. त्यांना पक्षाचे 9 आणि अपक्ष नीता पाडाळे यांच्यासह 10 मते मिळाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.