Pimpri : संचारबंदी लागू होताच पिंपरी चिंचवड शहरात नाकाबंदी; शहरातील मुख्य रस्त्यांवर बॅरिगेटिंग

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू केली. संचारबंदीची घोषणा होताच पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरातील मुख्य रस्त्यांवर बॅरिगेटिंग करून नाकाबंदी सुरू केली आहे.

सुरुवातीला पुणे शहरात आणि त्यानंतर पिंपरी चिंचवड शहरात वाहनबंदी लागू करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी शहरातील विविध रस्त्यांवर बॅरिकेड लावून वाहने अडविण्यास सुरुवात केली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या जमावबंदीचा नागरिकांवर फरक पडत नसल्याने राज्यात संचार बंदी लागू करण्यात आली आहे. तसेच राज्यातील सर्व जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून बाकी सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. जीवनावश्यक बाबी वगळता अन्य सर्व वाहतूक आणि हालचाली बंद करण्यात आल्या आहेत. पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेने शहरातील सर्व विभागात प्रमुख रस्त्यांवर बॅरिगेटिंग केले आहे. बॅरिगेटिंग करून नाकाबंदी सुरू केली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील सर्व रस्त्यावर पोलिसांचा वावर आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या व्यतिरिक्त केवळ पोलीस रस्त्यावर आहेत. अन्य एखादे वाहन आल्यास पोलिसांकडून त्याची कसून चौकशी होते. तसेच शहरातून बाहेर जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. शहरातून बाहेर जाण्यास तसेच शहराच्या आत येण्यास मनाई करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातून जाणा-या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खडकी येथील हॅरीस ब्रिज, नाशिक फाटा कासारवाडी, मोरवाडी चौक पिंपरी, चाफेकर चौक चिंचवडगाव, शिवाजी चौक मोहननगर, भक्ती-शक्ती चौक निगडी, देहूरोड सेंट्रल चौक, तळेगाव चौक, मोशी रोड भोसरी, चाकण चौक, त्रिवेणीनगर तळवडे चौक आणि अन्य ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे. नागरिकांनी संचारबंदीचे पालन करावे, तसेच घरात बसून कोरोनाचा संसर्ग टाळून स्वतःची व समाजाची मदत कारावज, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.