Pune News : रात्री दहानंतर पुण्यात नाकाबंदी, विनाकारण फिरणाऱ्यांची होणार चौकशी

एमपीसी न्यूज : गणेशोत्सव काळात नागरिकांनी पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात गर्दी करू नये असे आवाहन प्रशासनाकडून सातत्याने केले जात आहे. असे असतानाही शहराच्या अनेक भागात मोठी गर्दी होत आहे. गणपती पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसून येत आहेत.

गौरी बरोबरच पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर मंगळवारपासून शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्त्यावरील गर्दी वाढली आहे. त्यामुळे पोलिसांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून या भागात रात्री दहानंतर नाकाबंदी करण्यास सुरुवात केली आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात पोलिसांकडून कडक नाकाबंदी करण्यात येणार आहे. रात्री दहानंतर स्थानिक रहिवासी व वैद्य कारणाशिवाय फिरणाऱ्या व्यतिरिक्त इतरांकडे चौकशी करण्यात येणार आहे अशी माहिती सह पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र शिसवे यांनी दिली आहे.

पुण्याच्या मध्यवर्ती परिसर असलेल्या भागात मानाचे पाच गणपती आहेत. या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे ही गर्दी रोखण्यासाठी पोलिसांनी कडक नाकाबंदीचे नियोजन केले आहे. मध्यवर्ती भागात असणाऱ्या प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी पॉइंट उभारण्यात आले आहेत. रात्री दहानंतर या विनाकारण फिरणाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. शहरातील टिळक रस्ता वाहतुकीसाठी मोकळा असणार असून मध्यवर्ती भागात जाताना मात्र नागरिकांची चौकशी करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.