Blog by Bhagyashree Kulkarni : कोरोना…लॉकडाऊन आणि मनाच्या पॉझिटिव्हीटीसाठी श्री एकतत्वम अकादमीचा खारीचा वाटा…

एमपीसी न्यूज – सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जगभरातील सगळ्यांनाच लॉकडाऊनचा फटका बसला आहे. त्यातही आजूबाजूला सतत घडत असलेल्या नकारात्मक घटनांमुळे सगळ्यांच्याच मनावर या विषाणूचे सावट आहे. पण या अशा वातावरणातही जास्तीत जास्त लोकांना मनाने पॉझिटिव्ह कसे ठेवता येईल यासाठी पुण्यातील एका संगीत अकादमीने एक प्रयत्न केला आहे. त्याच विषयावरील भाग्यश्री कुलकर्णी यांचा पुढील ब्लॉग आम्ही सादर करीत आहोत…

=========================

गेल्या वर्षी मार्च महिन्यात एकाएकी सर्व जनजीवन जागीच थांबले. कोणीही स्वप्नात विचार केला नसेल अशा महामारीने संपूर्ण विश्वाला अगदी ग्रासून टाकले. रोज वेगवेगळ्या कारणाने घरातून बाहेर पडणारे सगळेच एका क्षणात कैदेत टाकल्यासारखे घरबंद झाले. सुरुवातीचा काळ नवनवीन अनुभवांचा ठरला. कित्येकांनी तर थोडासा सुस्कारासुद्धा सोडला की चला पुढले काही दिवस रोजचे तेच तेच रुटीन आता जरा बदलेल. परंतु माणसाच्या रोजच्या जगण्याच्या व्याख्याच बदलून जातील असं कोणाला वाटलं नसेल.

पूर्वी मे महिन्यात मुलांना सुट्ट्या असत आणि घरातले इतर मंडळीसुद्धा आपली नोकरी व्यवसाय सांभाळून या सुट्टीच्या दिवसांचा आनंद घेत असत. पण ही सुट्टी इतकी मोठी आणि वेगळीच असेल याची कल्पना कोणाला नव्हती. मग काय सुरु झाले ते पत्त्यांचे डाव, रेसिपीजचे बेत, झूम कॉलवर भेटी गाठी आणि नानाविध नवीन कल्पना… पण काहीच दिवसात याचा वैताग येऊन एक उदासीनता पसरायला लागली… गणपती उत्सव, दिवाळीसुद्धा केव्हा आले आणि गेले कळलं नाही…

डिसेंबरच्या शेवटच्या दिवशी काहीसा उत्साह दिसला… नवीन वर्षात हळू हळू सगळं स्थिरस्थावर होत असतानाच पुन्हा एकदा तेच संकट दाराशी येऊन थबकले… मात्र या वेळेस त्याची व्याप्ती आणि भीती जरा जास्तच वाढली होती… संकट मागच्या वेळेपेक्षा मोठे आहे आणि आता ते जवळपास सगळ्यांच्याच दारात उभे आहे आणि अशा वेळेस सगळीकडून फक्त वेगवेगळ्या माहितीचा भडीमार सुरु झालाय. वृत्तपत्रापासून ते व्हॉटस अ‍ॅपपर्यंत जिथे बघाल तिथे फक्त या एकाच गोष्टीची चर्चा आहे.

आज काल फोन वाजला तरी भीती वाटायला लागली आहे. योग्य ती खबरदारी घेण्याचा सगळे आटोकाट प्रयत्न करीत आहेतच पण या कठीण काळात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे मनाने खंबीर राहण्याची आणि आपल्या कुटुंबासह आपल्या आसपासच्या सगळ्यांनाच पॉझिटिव्ह ठेवायची. खरंतर आजकाल पॉझिटिव्ह हा शब्द सुद्धा नकोसाच वाटायला लागला आहे…

_MPC_DIR_MPU_II

अशातच एक कल्पना सुचली आणि आम्ही त्यावर काम करायला लागलो. श्री एकतत्वम अकादमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स या माझ्या संस्थेतर्फे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, उप शास्त्रीय संगीत, सुगम संगीत असे विविध संगीताचे प्रकार शिकवले जातात. मी स्वतः संगीतात एम ए केले असून संगीत मार्तंड पंडित जसराज यांच्या मेवाती घराण्याशी मी जोडलेली आहे. तसेच पंडित रतन मोहन शर्मा यांच्याकडे माझे पुढील शिक्षण सुरु आहे. माझ्या सर्व गुरूंनी दिलेल्या प्रोत्साहनातून मी पुण्यात संगीताचे वर्ग घेते.

याच माझ्या विद्यार्थ्यांना घेऊन काही उपक्रम करावा असे डोक्यात आले. मी हि कल्पना लोकांसमोर मांडली, मुद्दा इतकाच होता कि रोज समोर येणाऱ्या निगेटिव्ह गोष्टींपासून थोडा काळ दूर राहण्याची आणि स्वतःमध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याची संधी लोकांना मिळवी. गेले वर्ष भर आमचा क्लास हा झूम कॉलच्या माध्यमातून सुरु होताच त्यावर बरहुकूम म्हणून यंदा माझ्या विद्यार्थ्यांना घेऊन ऑनलाईन कराओकेची स्पर्धा घेण्याचे डोक्यात आले. सुरुवातीला वाटलं याला फार प्रतिसाद मिळणार नाही. पण म्हणता म्हणता जवळपास 100 स्पर्धक जोडले गेले आणि हि स्पर्धा आता तीन फेरी मध्ये होऊ घातली आहे.

आमच्या श्री एकतत्वम अकादमीच्या यू ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपणही या स्पर्धेचा आस्वाद घेऊ शकाल. शनिवारी (दि.15) दुपारी 12 पासून या स्पर्धांच्या व्हिडिओचे  https://www.youtube.com/channel/UCUaTcINAuPVK-pyhel_CnSQ  या यू ट्यूब चॅनेलवर प्रक्षेपण करण्यात येणार आहेत. स्पर्धेत सामील सर्व स्पर्धकांनी आपापली आपापली गाणी ही आपल्या आपल्या घरी बसून ध्वनिमुद्रित केली असल्याने त्याच्या रेकॉर्डिंगच्या गुणवत्तेमध्ये थोड्याबहुत प्रमाणात फरक जाणवू शकतो तरीही ऐकणाऱ्या रसिक श्रोत्यांनी आणि प्रेक्षकांनी याची नोंद घ्यावी… तसेच ही स्पर्धा कुठलाही व्यावसायिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आयोजित करण्यात आलेली नाही.

स्पर्धा हा एक भाग झाला पण यातून आमच्या एक गोष्ट ध्यानात आली ती म्हणजे या 100 लोकांच्या माध्यमातून आम्ही 100 कुटुंबातलं वातावरण बदलू पाहतो आहे आणि खरोखर त्याचा सकारात्मक परिणाम होताना आम्हाला दिसतो आहे. या निमित्तानेच आमचे इतर अशा संस्थांना सुद्धा आवाहन आहे कि आपल्या आसपासच्या लोकांसाठी आणि त्यांच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी असे वेगवेगळे उपक्रम राबवलेच पाहिजेत.

या महामारीला तोंड देण्यासाठी सगळेच वेगवेगळे प्रयत्न करीत आहेत तर आपला एक असा प्रयत्न काही घरांमध्ये थोडा बहुत का होईना आनंद पसरवू शकेल याची स्वानुभवावरून आम्हाला खात्री वाटते. थोडी आधी हि कल्पना सुचली असती तर कदाचित संपूर्ण पुण्यासाठी हा उपक्रम राबवता आला असता. आमची संस्था त्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहील. प्रत्येकाने आपल्या आनंदाचा वाटा सगळ्यांशी थोडा थोडा वाटला तर हे संकट लवकर दूर होईल. सगळ्यांना उत्तम आरोग्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.

भाग्यश्री कुलकर्णी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.