Blog by Devdatta Kashalikar: एक छोटासा  टब!

बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी आज होता फक्त एक छोटासा टब. माझं, माझं म्हणताना आपलं प्रतिबिंब खरंच केवढं असतं, हे दाखवणारा व आपल्या मर्यादा दाखवणारा एक छोटासा टब! वाचा… देवदत्त कशाळीकर यांचा ब्लॉग!

————————————————

एक छोटासा टब!

मास्कच्या आत झाकलेले चेहरे, पावसाची रिपरिप, गर्दी न करता घरीच बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन करण्याचे महापालिकेचे आदेश आणि दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप देण्याची आलेली वेळ.

या वर्षी सगळंच वेगळं चाललंय… बाप्पाच्या आगमनाआधी बाजारात तयारीच्या खरेदीला जाताना मनात धाकधूक. एखादा शेजारचा पाहुणा जरी आरतीला आला तरी धाकधूक… ना जल्लोषात स्वागत करता आलं, ना मनासारखी आरास…

पण बाप्पा घरी आला आणि हायसं वाटलं. बाप्पा येणार येणार म्हणता दीड दिवसाच्या बाप्पाला आज जड अंतःकरणानं निरोपही झाला.

एकामागून एक महिने सरत आता सहा महिने लोटले तरी भीती कायम आहे त्याची. सणवार सरत आहेत, मनावर दगड ठेवून, होईल सर्व नीट या आशेनं एक मन ओढतंय पुढे… एक मन म्हणतय, हवंय ते ”माझं” मोकळं आकाश… माझं आहे ते… !!

कुणाचाच  इलाज नाहीये…. कुणाच्या घरात तर कुणाच्या टेरेसवर आज बाप्पाला टाटा करावा लागला.

नदीवर भिरभणारा वारा आज मनातच वाहिला, आसमंतामध्ये घुमणाऱ्या आरत्या, किणकिणणाऱ्या झांजा उगाच भास होऊन थांबल्या. फुलांचा,  उदबत्त्यांचा एकत्र दरवळ मन नुसते शोधत राहिले. ठेका धरायला लावणारे ढोल मौनात गेले.

आज होता फक्त एक छोटासा टब. माझं, माझं म्हणताना आपलं प्रतिबिंब खरंच केवढं असतं, हे दाखवणारा व आपल्या मर्यादा दाखवणारा एक छोटासा टब!

लेखन- छायाचित्रण

देवदत्त  कशाळीकर 

[मुक्त वृत्त छायाचित्रकार]

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.