Blog by Devdatta Kashalikar : कामगारनगरीतील थांबलेला एक क्षण …. 

A stopped moment in the city of workers

​एमपीसी​ न्यूज ​-  सततच्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेला कामगार, कष्टकरी, पुरता मेटाकुटीला आला आहे. पायातलं बळ निघून गेलंय कशी चालवू सायकल माझी, असाच जणू प्रश्न त्याला पडला आहे. वाचा मुक्त वृत्त छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांचा हा ब्लॉग…

माझा  प्रवास  अज्ञाताच्या दिशेने चालू आहे ​​की शाश्वताच्या काहीच कळत नाहीये. रोजच दिवसभर वाजणारे सायरन मनात काहूर  माजवतात.

वेळ, दिशा, वार, तारीख सर्वच भरकटलेल्या नावेसारखे वाटतात.

फक्त कोविड चे म्हणावे तरी शेकडो मतप्रवाह माझ्या काच फुटलेल्या ​मोबाईलवरही​ वाहत असतात. अगदी सतत… त्यातील  एका प्रवाहात जरी स्वतःला नेऊन ठेवले या आशेने ​की मिळेल कधीतरी किनारा तर लगेच दुसरा मतप्रवाह मला दुसऱ्याच बाजूला  ढकलतोय.

कॅलेण्डरवरच्या तारखा आता फक्त आकडे होऊन राहिलेत, पुढच्या महिन्यात त्याच रंगात तसेच दिसणारे, बदलताहेत फक्त  पाने… पाचोळा होऊन…!

तरीही मी माझी सायकल दामटली अनेकदा पण खुप कुंपणं आड आली कधी बांबू व पत्र्याची तर कधी माझ्या ऐपतीची.

मी कोण ? एक कामगार या उद्योग नगरीतील  खूप दूरवरून पोट भरण्यासाठी आलेला एक गर्दीतील चेहरा.. फक्त आधारकार्डवर तेव्हा आयुष्यात फोटो छापून आलेला.. मी सामान्य होतो, आहे, सामान्य राहीन स्वतःची कसलीही मतं नसलेला  मी समाज नेईल त्या प्रवाहात सामील होणारा मी, वरातीत नाचताना सुद्धा शंभर वेळा विचार करणारा मी, रेशन च्या रांगेत उभं राहताना स्वतःला धन्य मानणारा मी, माझ्या कुटुंबाचा फक्त काय तो बाप एवढा सोपा असूनही मी मला सापडत नाहीये अलीकडे. लाट मोठी भयानक आहे. धरून ठेवायचे आधार नाही म्हणतात आजकाल, म्हणून हरवलोय ..

मोबाईलच्या प्रवाहात, टीव्ही वरच्या बाजारात मलाच शोधतोय नव्याने. तीन-चार महिने झाले आता या बिमारीला येऊन पूर्वी मी सगळं होईल नीट म्हणत आरश्यासमोर उभा राहिलो ​​की सापडायचो.. आता आरशात सुद्धा सापडत नाही मी तिने आरशाच्या  कडेला  लावलेल्या टिकल्या, कधी काळचा पत्रिकेतला कापून चिटकवलेला गणपती आणि आरशाची ती जुनी काळवंडलेली  चौकट

एवढंच दिसतं आताशी.. त्यात मी नसतो कुठेच.

उत्तर नाही मिळत पुन्हा कधी दिसणार मी त्या आरशात पूर्वीसारखा. डबा घेऊन कामाला जाताना हळूच केस नीट करताना , वाढत्या वयातही स्वतःला हिरो समजणारा व सायकल म्हणजे मर्सिडीज असल्याचा आव आणून टांग टाकणारा कुठे हरवलोय मी?

ते रोजचे यंत्रांचे आवाज, ते एकत्र डबा खाणं, घरी येताना टपरीवर कटिंग पिणं.. सर्वच थांबलंय आता, मालक पूर्वी कारण सांगत  नव्हता, आता विचारण्यासाठी तोच राहिला नाही..  कुणाला काय विचारू काहीच सुचत नाही .

जवळचं म्हणावं असं जे काही होत ते कधीच संपलंय. तिच्या चेहऱ्यावर आता कोणतंच चित्र दिसेना झालंय.. भांडण व्हायला पण कारण लागत, तेही नाही राहिलं आताशी .

पायातलं बळ निघून गेलंय कशी चालवू सायकल माझी ?

घरमालकाचा फुटक्या मोबाईलवर मात्र फोन येतो आणि उरलीसुरली ताकदही संपते माझी .

किती वेळा सांगू पिल्लाना संपलीय गुडदाणी दुकानातली .

अस्वथ मन आता बधिर होऊन थांबलंय.. कधीतरी समोरून येणाऱ्या गाडीचा प्रकाश आता सहन होत नाही मला .

रोजचाच  रस्ता  पण अनोळखी वाटतोय मला, रोजचेच चेहरे मास्कच्या आडून संशयी नजरेनं पाहताना वाटतात मला, संशय मोठ्ठा झालाय काळ्या ढगाएवढा ..

स्पर्श कलंकित झालाय वटवाघळासारखा ..

आता फक्त मी आणी माझी सायकल एवढंच​ ​” नातं ” वाटत ..

नेईल कदाचित तीच मला नव्या प्रकाशवाटेकडे !!

 देवदत्त  कशाळीकर

9850600625/9922501402

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.