Blog: कोरोना… मृत्यू… आणि मृतदेहाचेही आयसोलेशन! (फोटो फिचर)

Blog by Devdatta Kashalikar : Corona ... death... and isolation of the corpse too! (Photo Feature)

एमपीसी न्यूज – चष्म्याचा नंबर वाढलाय का, म्हणून डोळ्यांच्या डॉक्टरकडे विचारायला गेलो असताना सकाळी 10.40 ला एका मित्राचा फोन आला. त्याने बातमी दिली. आज सकाळीच कोरोनामुळे एक डेथ झालीय, मृत व्यक्तीचा सख्खा भाऊ डॉक्टर आहे आणि बॉडी यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून थोड्याच  वेळात निघेल. 

डॉक्टरकडून अचानक पळून जाताना तिथल्या लोकांना काय वाटलं असेल याचा विचारही करायला वेळ नव्हता… घरी आलो, कॅमेरा चेक केला आणि निघालो…  कुठल्या स्मशानभूमीत आपल्याला जायचंय, हे एव्हाना कळून चुकलं होतं… करोना झालेल्या  डेड बॉडीची फोटो स्टोरी कव्हर  करायला जातोय,  हे घरातही एव्हाना कळलं होतं.

स्मशानभूमीत आज कर्कश्श  ओरडणारे कावळेही दिसत नव्हते, शांतपणे एक शववाहिका येऊन थांबली होती. त्यामधून पिंपरी-चिंचवड  महानगरपालिकेतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील तीन कर्मचारी आले होते व एक  करोनाशी झुंजत हरून शांत झालेलं प्लास्टिकमध्ये गुंडाळलेले निष्प्राण शरीर!

नागेश वाघमारे हे त्यातीलच एक कर्मचारी! ज्यानं त्या बॉडीसोबत पाच किलोमीटरचा प्रवास केला होता, त्यानं मदतीसाठी कुणी येईल का, म्हणून  बॉडी शववाहिकेतून खाली घेण्यासाठी खूप  प्रयत्न  केले, पण बॉडी  खूप  जड  होती, खाली घेताना जर पडली तर काय, असा प्रश्न  त्याच्यासमोर  होता.

नागेशनं लांब 150 मीटरवर उभ्या असलेल्या मृताच्या दोन नातेवाईकांना हाका मारल्या, पण कुणीच जागेवरून हलत नव्हतं.  आधीच खूप लांब उभी असलेली ती दोन माणसं प्रत्येक हाकेला अजून अजून लांब जात होती. …शेवटी नागेशने त्यांचा नाद सोडला. कशी बशी सावरत  बॉडी स्ट्रेचरवर घेतली. स्वतः आणि  दोघांच्या मदतीनं झप झप पावलं टाकत तो विद्युतदाहिनीजवळ येऊन थांबला.

एव्हाना स्मशानभूमीत कर्मचाऱ्याने विद्युतदाहिनी चालू केली होती आणि पुन्हा प्रश्न होता की,  इथवर मी सर्व केलं… आता तरी कोणी येईल! त्या बॉडीला बांबूच्या तिरडीवर ठेवील, पण यावेळीही हाका व्यर्थ गेल्या…

कशीबशी बॉडी दाहिनीच्या ट्रॅकवर ठेवली गेली…  ना मंत्र, ना कुणाचा शेवटचा नमस्कार, ना  रडायला कोणी, ना डोळे पुसणारे पदर, ना  हुंदके, ना आसवं, ना टाहो, ना आक्रोश, शिल्लक होता फक्त जीवघेणा कोरोना… आणि…. कोरोना… माणसाच्या असहायतेकडे पाहात छद्मीपणे हसणारा कोरोना… !  मग शून्यात डोळे लावत नागेश वाघमारे यानेच त्या बॉडीसमोर शेवटची  प्रार्थना म्हटली, जो हे जग सोडून गेला, त्याच्यासाठी जो कुणीच नव्हता त्याचा! अगदी कवटाळून घेणारा मृत्यूही कोरोनामुळं किती तुसडेपणानं वागतो हे मीसुद्धा डोळ्यांनी पाहिलं, कॅमेऱ्यानं टिपलं… अगदी जवळून….

कोरोना इतका भयानक आहे की, कुणी म्हणजे कुणीच कुणाचं नसतं… आणि… असलंच तरी कुणीही…. अगदी कुणीच…. काहीही करू शकत नाही… हे जाणवून गेलं!

मी निघताना महानगरपालिकेच्या तीन कोरोना योद्ध्यांना वंदन  केलं…. अगदी हृदयापासून… हात जोडून!… आणि पुन्हा  मोहिमेवर निघालेल्या त्या  नागेश वाघमारेच्या मानेकडे लक्ष गेलं आणि  मी चमकलोच…

_MPC_DIR_MPU_II

मानेवर स्पष्ट ठसठशीत देवनागरी लिपीत गोंदवलेलं होतं  ” मृत्यू ” !!!

– देवदत्त कशाळीकर
वृत्तछायाचित्रकार, एमपीसी न्यूज

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील कर्मचारी नागेश वाघमारे यांनी कोरोनाबाधित मृतदेह उचलण्यासाठी मृताच्या नातेवाईकांकडे केली मदतीची याचना
स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीपर्यंत मृत व्यक्तीचे नातेवाईक येतील या आशेने पाहणारे महापालिका कर्मचारी
मृतदेहावरील प्लास्टीक आवरण चुकून फाटले तर थेट मृतदेहाला हात लागून कोरोना संसर्गाचा धोका होऊ शकतो म्हणून सहकारी कर्मचाऱ्याकडे हातमोजे मागताना
सुमारे दीडशे मीटर लांबून हे सर्व पाहणारा मृताचा कोणी तरी नातेवाईक मदतीला येईल म्हणून नागेश वाघमारे व सहकाऱ्यांनी हाका मारल्या व ते नातेवाईक अधिक लांब गेले.
नेहमीप्रमाणेच भेसूर वाटणाऱ्या या ठिकाणी आज चित्र वेगळे होते. पाणावलेले डोळे नव्हते की आक्रोश करायला कोणी नव्हते.
बरोबर आलेले दोन सहकारी देखील लांब गेले आणि आपलाच माणूस समजून नागेश वाघमारे यांनी शेवटची प्रार्थना केली. भेसूर नि:शब्द वातावरण व धुरकटलेल्या भिंतीशिवाय ती प्रार्थना ऐकायला कोणीही नव्हतं
आणि खरंच कुणीच नसतं शेवटी!
… पुन्हा मोहिमेवर निघालेल्या शवविच्छेदन विभागातील कर्मचारी नागेश वाघमारे यांच्या मानेकडे लक्ष गेलं आणि चमकलोच… मानेवर स्पष्ट ठसठशीत देवनागरी लिपीत गोंदवलेलं होतं ”मृत्यू”!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.