Blog by Dr Gouri Ganpatye : रुग्णानुभव

Blog by Dr Gouri Ganpatye : Patient experience

एमपीसी न्यूज : एखाद्या पेशंटचे वेळेवर निदान करावे आणि योग्य वेळेत त्याचा उपचार होऊन पुन्हा तो Thanks म्हणण्यासाठी आपल्याकडे यावा यासारखे Satisfaction मेडिकल Field मध्ये दुसरे कोणतेही नाही. या सुखाचे मोजमाप पैशांच्या तागडीत करताच येत नाही, आपलाही Correct Diagnosis चा इगो सुखावतो. पैसा कितीही ओतला तरी अशा समाधानाचे पारडे जडच असते. हा माझाच नाही तर सर्वच डॉक्टर मंडळींचा अनुभव आहे.

पेशंट बरा झाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचे सुख बघण्यात काही वेगळेच समाधान असते. हे समाधान आणि पेशंटकडून मिळणाऱ्या आदराची वागणूक हेच खरं आम्हां डॉक्टर मंडळींच टॉनिक असतं. हा अनुभव वरचेवर घेण्यासाठी आम्ही मंडळी झगडत असतो. पण आज मला वेगळाच अनुभव आला. ज्या पेशंटच्या चेहऱ्यावर आपल्यामुळे सुख पसरलं ते हिरावून घेण्याचं पातकही मलाच करावं लागलं. अजूनही त्या पेशंटचा हसरा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून हलत नाहीये. अज्ञानात असलेले सुख तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वहात होत आणि ते सुख हिरावून घेण्याचं मोठ्ठ पाप मला करावं लागणार होतं. हीच पेशंट माझ्याकडे साधारण ३-४ वर्षांपूर्वी उजव्या बाजूच्या छातीत गाठ आलीये म्हणून आली होती. तपासल्यानंतर मला शंका आली की ही कॅन्सरची गाठ असावी. त्यानंतर पुढील काही तपासण्या करून घेतल्या. खात्री झाल्यानंतर पेशंटला पुढे जाण्याचा सल्ला दिला.

पेशंट टाटा कॅन्सर हॉस्पिटलला operate झाली. त्यानंतर आधी नियमितपणे आणि नंतर – नंतर काही त्रास झाल्यास न चुकता ती माझ्याकडे येत असे. ऑपरेशनची जखम, स्त्रीत्वाची पुसून टाकलेली खूण, डोक्यावरचे गेलेले केस हे सगळ तिनं हसत हसत स्वीकारलं. प्रत्येक वेळी आवर्जून तुम्ही कसं वेळेत निदान केलंत आणि मुलाने सुद्धा मुंबईत कशी धावपळ केली याची आठवण काढत असे. “तुमच्या आन देवाच्या कृपेने मी आता बरा आसय, माका मागचो कसलोच त्रास आता वाटना नाय” असे हसऱ्या आणि आत्मविश्वासपूर्ण चेहऱ्याने सांगत असे.

हल्ली पंधरा दिवसांपूर्वी ती तपासायला आली. “बाईनु, हल्ली बरीशी भूक लागणा नाय…वाईच काम केला की लगेच अशक्तीपन येता…बगा बगुया माका आन बरासा टोनिकचा औषद देवा…माका बरीशी भूक लागान दे…तरतरीपन येऊक होया”… अशी अपेक्षावजा ऑर्डर तिने सोडली…तपासताना लक्षात आलं, एवढेसे बोलतानाही तिला धाप लागतीये…तरी.नेहमीप्रमाणे तिने सांगितलेच,” बाईनु मागच्या सारख्या काय वाटना नाय, वायच जरा थकावपन इला म्हणून इलय”…माझ्या डोक्यात मात्र वेगळंच चक्र सुरु झालं.

कॅन्सर ची Treatment पूर्ण झाल्यानंतर सुद्धा दर सहा महिन्यांनी ती नियमितपणे टाटा हॉस्पिटलमध्ये तपासणी साठी जात होती. मी सहजपणे विचारलं ह्ल्ली चेकअपला कधी जाऊन आलीस …? “बाईनु फेब्रुवारीत जाऊन इलय…आता जुलैत बोलावला हा….लावणीक झील येतलो, तेच्या वांगडा जातलय” तिची बडबड सुरु होती…माझ्या डोक्यातली शंकेची पाल काही केल्या जाईना. मी तिच्या नवऱ्याला केबिनमध्ये बोलावलं आणि सांगितलं उद्या सोनोग्राफीचे डॉक्टर येणार आहेत. आपण हिची सोनोग्राफी करून बघुया…नवराही लगेच तयार झाला…”चलात, करूकच होई सोनीग्राफ ….आजकाल जेवणावर मनशा जाणा नाय तिची”…पण माझ्या डोक्यात काय चालले आहे त्याचा त्या दोघांना सुतराम सुद्धा अंदाज नव्हता. तिचा त्याही परिस्थितीत हसरा चेहरा आणि माझ्यावर असणारा प्रचंड विश्वास मला पुढे काही बोलायला देईना…”या उद्या”…असे सांगून मी पुढच्या पेशंट कडे वळले…

सोनोग्राफीच्या खोलीत सुद्धा ती हसतमुखाने आली….डॉक्टरांनी सोनोग्राफी करता करता प्रश्न विचारायला सुरुवात केली…त्यांनाही हिने हसत सांगितले, “माजा कॅन्सरचा ओप्रेशन झाला हा…पण आता माका तेचो काय एक त्रास नाय”…सोनोग्राफी चालू होती, मला मात्र पोटात एकदम धस्स झालं …माझं पूर्ण लक्ष सोनोग्राफीच्या स्क्रीन वर होतं…..आणि डॉक्टरांचा probe लिव्हरच्या एरीयावर फिरत होता…संपूर्ण लिव्हर मध्ये गोल गोल आकाराच्या चकत्या दिसत होत्या… डॉक्टर विचारत होते, भूक कमी लागते का, थकवा वाटतो का …? आणि डॉक्टरला आपण न सांगता कसं काय कळलं म्हणजे डॉक्टर नक्की चांगला आहे या आनंदात ती जोरजोरात मान डोलवून सांगत होती…”होय, भूकच कमी लागता, म्हणानच बाईंन कडे इलय”…माझा चेहरा मात्र साफ पडला होता… मला निदान कळून चुकलं होतं…

चार वर्षं दडी मारून बसलेल्या कॅन्सरने पुन्हा डोकं वर काढलं होतं आणि आता तर शरीरातला महत्वाचा अवयव लिव्हर, त्यावरच घाला घातला होता… आता या आजाराचे निदान Metastasis म्हणजे पसरलेला कॅन्सर असे झाले होते. यात पुढे करण्यासारखं काही फारसं शिल्लक नव्हतं. डॉक्टर रिपोर्ट सांगत होते आणि मी तो type करत होते… पण डोकं मात्र सुन्न झालं होतं… आता हिच्या प्रश्नांना मी काय उत्तरं देऊ …?

मेडिकल सायन्ससुद्धा या केसमध्ये काही करू शकत नाही हे तिला कसं समजावून सांगू ? पेपर मध्ये, TV वर जाहिरातीतून कितीही सांगितलं तरी कॅन्सर बरा होणं हे नशिबावरही अवलंबून आहे हे तिला आणि तिच्या नातेवाईकांना कसे पटवून देऊ…? तिच्या पुढे अजून सात आठ पेशंट होते… नंतर रिपोर्ट सांगायला केबिनमध्ये बोलावते असे सांगून आम्ही पुढच्या पेशंटकडे वळलो… पुढचा पाऊण तास मी मनातल्या मनात उजळणी करत होते की हिच्याशी कशा पद्धतीने बोलू…? मला तिच्या चेहऱ्यावरच हसू घालवण्याच पातक करायचं नव्हतं… पण तिला व तिच्या नातेवाईकांना सांगितल्यावाचून दुसरा पर्याय नव्हता.

शेवटी शक्य तितका तिचा चेहरा बघण्याचे टाळत तिच्या नवऱ्याला सांगितले तुम्हाला लवकरच परत टाटामध्ये जावे लागेल… तरीही तिने विचारलेच… “बाईनु, पण तारीक जुलैची दिल्ली आसा….तेव्हा गेलय तर नाय चलाचा …?” मी पटकन बोलले, “नाय गे… ह्या मागच्यातला वाटता” ….”असा हा काय ?” म्हणत ती जराशी गंभीर झाली पण पुढच्याच क्षणाला आत्मविश्वासाने म्हणाली, “तुमी सांग्तास तर आमी बेगीन जातो. मागच्या टायमाला तुमी खटपट केलास आन माका जगवून घेतलास… माजा तुमच्यावर विश्वास असा… बरा होतला मा…? तुमी घेतलास मा जवाबदारी ?”

माझ्या तोंडून शब्दच फुटेना… कसं सांगू तिला की बाई आताच्या वेळचे निदान वेगळे आहे, इतके उपाय करूनसुद्धा कॅन्सर शरीरात पसरला आहे आणि आता तुझे आयुष्यातले मोजकेच दिवस शिल्लक आहेत… मी मनातल्या मनात आवंढा घोटला आणि तिला शक्य तितक्या हसत सांगितलं, “जास्ती बोला नको, आदी मुंबईच्या डॉक्टराक भेटून ये… मिया हडेच असंय, मगे भेटू”… तिला केबिनच्या बाहेर पाठवून मी आधी बेसिनकडे वळले….डोळ्यावर सपासप पाणी मारून अडवलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली….चेहरा पुसला आणि शक्य तितक्या हसऱ्या चेहऱ्याने सिस्टरला सांगितले….पुढचा पेशंट घे……!

 

डॉ. गौरी गणपत्ये
M.S ( Ayu ) OBGY
P.G.D.Diet

स्त्रीरोगतज्ञ व आहारतज्ञ

9423511070

[email protected]

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.